सोलापूर विद्यापीठात पेपर फेरतपासणीसाठी २ हजार ७४१ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 10:43 AM2018-08-27T10:43:39+5:302018-08-27T10:45:35+5:30
सोलापूर विद्यापीठ : दोन महिने करावी लागते प्रतीक्षा
सोलापूर : सोलापूर विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या विविध परीक्षांच्या पेपरची फेरतपासणी करण्यासाठी २ हजार ७४१ अर्ज परीक्षा विभागाला प्राप्त झाले आहेत. पंधरा दिवसात पेपर तपासून देण्याचा नियम असताना विद्यार्थ्यांना दोन-दोन महिने प्रतीक्षा करावी लागत आहे.
सोलापूर विद्यापीठाच्या वतीने मार्च ते मे २0१८ दरम्यान सर्व विषयाच्या परीक्षा घेण्यात आल्या आहेत. सत्र-१, सत्र-३, सत्र-५ आदी परीक्षांमध्ये अभियांत्रिकी, शास्त्र, वाणिज्य, कला, अध्यापक, फार्मसी अशा सर्व विषयाच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
परीक्षेच्या निकालानंतर अनुत्तीर्ण झालेल्या व कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना ७ दिवसात फोटो कॉपीसाठी अर्ज करावा लागतो. फोटो कॉपी मिळाल्यानंतर ७ दिवसांमध्ये पेपर फेरतपासणीसाठी विद्यापीठाकडे पाठवावा लागतो.फोटो कॉपीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची मुदत दि.२५ जुलै पर्यंत होती. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर सिस्टीममध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना आॅनलाईन फोटो कॉपी प्राप्त झाल्या नाहीत. ज्यांना प्रति (कॉपी) मिळाल्या नाहीत त्यांना विद्यापीठ झेरॉक्स प्रती (मॅन्युअली प्रिंट) काढून देत आहेत.
फोटो कॉपी मिळाल्यानंतर तो पेपर पुन्हा फेरतपासणीसाठी पाठवावा लागतो. हा प्रकार एकीकडे सुरू असताना दुसरीकडे फेरतपासणीला अनेक अडचणी येत आहेत. फेरतपासणीसाठी विद्यापीठातील परीक्षा विभागाचे कर्मचारी स्वत: पेपर घेऊन प्राध्यापकांच्या महाविद्यालयात जात आहेत. पेपर तपासून घेत आहेत आणि निकाल जाहीर करीत आहेत. या प्रक्रियेत वेळ खूप जात असून याचा नाहक त्रास विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे.
बºयाच विद्यार्थ्यांचे प्रवेश यामुळे निश्चित होत नाहीत. प्रवेश घ्यावा की नाही असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर पडत आहे. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मात्र याचा मोठा फटका बसत आहे. सध्या बºयाच विद्यार्थ्यांना फेर तपासणीला गेलेल्या पेपरची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय राहिला नाही.
आॅनलाईन सिस्टीममध्ये तांत्रिक अडचणी आल्याने फोटो कॉपी देण्यास अडचणी येत आहेत. विद्यार्थांचा त्रास कमी करण्यासाठी लवकरात लवकर पेपर तपासण्यासाठी परीक्षा विभाग प्रयत्न करीत आहे. लवकरच फेर तपासणी पूर्ण केली जाईल.
डॉ. धवल कुलकर्णी, संचालक, परीक्षा मंडळ,
सोलापूर विद्यापीठ.