सोलापुरात वर्षभरात दोन हजार दुचाकी होतात स्क्रॅप; रिम, टायर, कार्बोरेटरला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 02:30 PM2021-02-05T14:30:53+5:302021-02-05T14:30:58+5:30
दुचाकी स्क्रॅपमध्ये प्लास्टिक, अल्युमिनियम, लोखंड, स्टील आणि तांबा मिळते. प्रत्येक गाडीत ते वेगवेगळे प्रमाण असते.
सोलापूर : शहरात दुचाकी स्क्रॅप करणारे पंचवीसपेक्षा अधिक व्यावसायिक असून, वर्षभरात त्यांच्याकडे दोन हजार दुचाकी स्क्रॅपसाठी येतात, असे स्क्रॅप व्यावसायिकांनी सांगितले. स्क्रॅपमध्ये आलेल्या दुचाकीमधून निघणारे कार्बोरेटर, रिम, टायर, बॅटरी, ट्यूब, क्लच हब, इंजिन चेंबर अशा सुट्या भागांना बाजारात खूप मागणी आहे. तर स्क्रॅप केल्यानंतर लोखंड आणि अल्युमिनियम पुणे, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई आणि बेंगलोर येथे विक्रीसाठी पाठवली जातात.
दुचाकी स्क्रॅप करण्यासाठी अथवा वाहनाची विल्हेवाट लावण्यापूर्वी नागरिकांना करांची थकबाकी भरून ‘आरटीओ’कडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. त्यासाठी शुल्क आकारले जाते. मात्र, नागरिक ‘ना हरकत’ न घेताच जुन्या गाड्यांना मॉडीफाइड करून वापरण्यावर भर देताना दिसतात.
एक दुचाकी स्क्रॅपसाठी तीन तास लागतात. गाडी स्क्रॅप करण्यापूर्वी वाहनधारकांकडून वाहन नोंदणीप्रमाणपत्र, आधार कार्ड, प्रतिज्ञापत्र, गाडीचा आणि त्यांचा फोटो घेऊन गाडी स्क्रॅप केली जाते.
काय मिळते स्क्रॅपमध्ये
- दुचाकी स्क्रॅपमध्ये प्लास्टिक, अल्युमिनियम, लोखंड, स्टील आणि तांबा मिळते. प्रत्येक गाडीत ते वेगवेगळे प्रमाण असते.
- मोटारसायकल - प्लास्टिक ३ किलो, अल्युमिनियम ४ ते ५ किलो, लोखंड ५० ते ६० किलो.
- मोपेड - प्लास्टिक ५ ते ६ किलो, अल्युमिनियम ६ ते ७ किलो, लोखंड ३५ ते ४० किलो.
- १०० सीसी मोपेड- प्लास्टिक २ ते ३ किलो, अल्युमिनियम ८ ते ९ किलो, लोखंड ४० ते ५० किलो.
असा आहे दर
- स्कूटी : १००० ते २०००
- ॲक्टिव्हा : ३००० ते ५०००
- मोटारसायकल ३००० ते ६०००
स्क्रॅप वाहनांतील सुटे भाग वापरण्यास उपयुक्त ठरू शकतात, अशा सुट्या भागांची विक्री अगदी कमी किमतीत केली जाते. राहिलेला स्क्रॅप व्यावसायिकांना दिला जातो. आम्हाला एका गाडीमागे जेमतेम दोन हजारांचा फायदा होतो.
- खालीद सालार, स्क्रॅप व्यावसायिक
--