घरफोड्यातील दोघा अट्टल गुन्हेगारांना अटक, २१ तोळे दागिने जप्त
By Admin | Published: July 3, 2016 11:57 AM2016-07-03T11:57:40+5:302016-07-03T11:57:40+5:30
गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिसी खाक्या दाखवून विविध गुन्ह्यातील चोरलेले २१ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ३ - घरफोड्यातील अट्टल गुन्हेगार सरदार भारत चव्हाण (वय- ५७) व द-याप्पा गंगाराव काळे (वय- ५७) यांच्याकडून गुन्हे शाखेच्या पथकाने पोलिसी खाक्या दाखवून विविध गुन्ह्यातील चोरलेले २१ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले.
गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व बाळासाहेब शिंदे हे आपल्या सहका-यासह गुन्हेगाराच्या शोधार्थ असताना खब-यायामार्फत त्यांना दप्तरी अट्टल गुन्हेगार असलेले द-याप्पा काळे व सरदार चव्हाण आणि त्याचे साथीदार यांनी शहरात मोठ्या घरफोड्या केल्याची माहिती मिळाली.
त्यांचा शोध घेताना सरदार चव्हाण निलमनगर भागात वावरत असल्याची बातमी मिळताच त्याच्यावर पाळत ठेऊन अटक केली. त्याला बोलते केले असता त्याने आपल्यासोबत द-याप्पा काळे आणि आणखी दोघांनी मिळून राजेंद्र चौकात टायरी दुकान व वसंतविहार येथील घर फोडल्याचे कबूल केले.
दोन्ही आरोपींना फौजदार चावडी पोलिसांनी अटक करुन जेलरोड पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. फौजदार चावडी हद्दीत घडलेल्या गुन्ह्यातील ६० ग्रॅम सोन्याचे दागिने, जेलरोड हद्दीच्या गुन्ह्यातील १५० ग्रॅम सोन्याच्या पिळ्याचे प्रत्येकी १०ग्रॅम वजनाच्या १५ अंगठ्या असा एकूण २१ तोळे दागिने त्याची बाजारमूल्य ५ लाख २५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
या आरोपींचे अन्य साथीदारांचाही शोध गुन्हे शाखेचे पथक घेत आहेत. त्यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात घरफोडीतील मुद्देमाल मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहा. पोलीस आयुक्त शर्मिष्ठा वालावलकर, पोलीस निरीक्षक शंकर जिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दत्तात्रय कोळेकर, बाळासाहेब शिंदे, सहा. फौजदार अतुल न्यामणे, हवालदार संजय बायस, जयंत चवरे, अनिल वळसंगे, दगडू राठोड, पो. ना. राकेश पाटील, मुन्ना शेख, सुभाष पवार, मंजुनाथ मुत्तनवार, भोई व पोलीस वसंत माने, धनंजय बाबर, गणेश शिर्के, शिवानंद भिमदे, इनामदार यांनी ही कामगिरी पार पाडली.