शेतजमिनीच्या कारणावरून दोघांवर कोयत्याने केला वार; एकाचा जागीच मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 09:50 AM2020-09-05T09:50:58+5:302020-09-05T09:51:41+5:30
गाडी अडवून कोयत्याने केले वार; एक जखमी, बाभूळगाव येथील एक जण ताब्यात
पंढरपूर : मागील भांडणाचा राग मनात ठेवून एकाने दोघांवर कोयत्याने वार केले असून यामध्ये एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना देगाव (ता. पंढरपूर) येथे घडली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे हरी पवार ( रा. बाभूळगाव तालुका पंढरपूर) नाव असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सतीश उर्फ बाळू हरी पवार व त्याचे आई-वडील शेतातील घरी होते. यावेळी लाला बबन शिंदे (रा. बाभूळगाव) यांनी पूर्वी दिलेल्या(२०१६) तक्रारीच्या कारणावरून भांडण काढून सतीशचे वडील हरी यांना हऱ्या तुला आज ठेवत नाही असे म्हणून शिवीगाळ दमदाटी केली. तसेच त्यांने सतीशच्या अंगावर दगड फेकून मारले. त्यात सतीशच्या उजव्या हाताचे खांद्यावर व पोटावर जखम झाली. त्याबाबत सतीश त्याच्या वडिलांसोबत तक्रार देणे करता मोटरसायकलवरून पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याला येत होते.
या दरम्यान लाला शिंदे यांनी देगावच्या शिवारातील गणेश गांडुळे यांच्या शेताजवळ मोटरसायकलला त्याची मोटरसायकल अडवली. कोयता घेऊन हाऱ्या तुला आता जित्ता सोडत नाही असे म्हणून हातातील कोयत्याने हरी पवार यांच्यावर कोयत्याने वार करून व लाथांनी मारून जीवे ठार मारले. व सतीश उर्फ बाळूच्या डोक्यात कोयत्याने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर लाला शिंदे याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास स. पो. नि. खरात करीत आहेत.