पुलावरून कोसळून दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:15 AM2021-07-03T04:15:37+5:302021-07-03T04:15:37+5:30
करमाळा : सालसे-कुर्डूवाडी रोडवर वरकुटेजवळ पुलावरून दुचाकी पडून मोटारसायकलस्वार जागीच मरण पावला. सोमनाथ खराडे (वय ३५, फिसरे तालुका करमाळा) ...
करमाळा : सालसे-कुर्डूवाडी रोडवर वरकुटेजवळ पुलावरून दुचाकी पडून मोटारसायकलस्वार जागीच मरण पावला.
सोमनाथ खराडे (वय ३५, फिसरे तालुका करमाळा) असे मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून, गुरुवारी रात्री हा अपघात झाला.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, तो गुरुवारी रात्री कव्हे (ता.माढा) येथून गावाकडे परतत होता. पुलाच्या कामाचा अंदाज न आल्याने दुचाकीसह तो पुलावरून खाली कोसळला. या पुलाचे काम सुरू असून, या ठिकाणी बॅरिकेट किंवा सूचनाफलक लावले नाहीत. मात्र, ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला असून, त्याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत आवताडे व फिसरेचे सरपंच प्रदीप दौंडे यांनी केली आहे.
---
...अन् अपघात उघडकीस आला
पुलावरून कोसळून खाली एकाचा मृत्यू झाल्याचे कोणालाही लक्षात आले नाही. या ठिकाणी पाणी साचल्याने दुचाकी व दुचाकीस्वार रात्री पाण्यात बुडाल्याचे कोणालाही लक्षात आले नाही. शुक्रवारी दुपारी पुलाच्या कामासाठी पाणी काढणे सुरू झाले, तेव्हा ही घटना उघडकीस आली.
--
मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
मयत सोमनाथ खराडे हे अत्यंत गरीब कुटुंबातील असल्याने, त्यांच्यापश्चात पत्नी व तीन लहान मुले आहेत. सोमनाथच्या अपघाती जाण्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. कुटीर रुग्णालय येथे मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. मात्र, संबंधित कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, खराडे कुटुंबाला आर्थिक मदत मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्याच्या नातेवाईक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
----
फोटो : ०२ करमाळा ॲक्सिडेंट
वरकुटेजवळ पुलावरून दुचाकी पडून मोटारसायकलस्वार मरण पावला. पुलाखाली पाण्यात पडलेली मोटारसायकलस्वार.