मित्रांसोबत गावी जात असल्याचं सांगून तरुण घराबाहेर पडला; पण नंतर घडलं विपरीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 09:35 IST2025-02-20T09:34:25+5:302025-02-20T09:35:06+5:30
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह तलावातून कोळी बांधवांच्या साहाय्याने बाहेर काढले.

मित्रांसोबत गावी जात असल्याचं सांगून तरुण घराबाहेर पडला; पण नंतर घडलं विपरीत!
कुसळंब : बार्शी तालुक्यातील महागाव येथील तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना काल १९ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे. गणेश अनिल सपाटे (वय २६, अलीपूर रोड बार्शी), शंकर उत्तम पटाडे (वय ४०, रा. यशवंत नगर, तुळजापूर रोड, बार्शी) अशी मृत युवकांची नाव आहेत.
मृत गणेश सपाटे यांचे वडील अनिल दत्तात्रेय सपाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा गणेश हा सोमवारी दि.१७ रोजी संध्याकाळी ५ वाजता आपल्या मित्रांसोबत गावाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडला. मात्र, दोन दिवस उलटल्यानंतरही तो परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा मोबाइलही बंद लागत होता. अखेर दि.१९ रोजी बुधवारी दुपारी २ च्या सुमारास अनिल सपाटे यांनी मुलगा गणेश याच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पांगरी पोलिसांचा फोन आला.
दरम्यान, पोलिसांनी कळवले की महागाव जवळील तलावातील पुलाजवळ दोन अनोळखी पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याचे सांगितले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी दाखल होऊन दोन्ही युवकांचे मृतदेह तलावातून कोळी बांधवांच्या साहाय्याने बाहेर काढले.