उडगी-सातनदुधनी रस्ता खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:22 AM2021-01-23T04:22:46+5:302021-01-23T04:22:46+5:30
या रस्त्यावरून ऊस वाहतूक, शेती मालवाहतूक, शाळकरी मुले दररोज ये-जा करतात. रस्त्याच्या दुतर्फा बाजूला काटेरी झाडीझुडपी वाढलेली आहेत. ...
या रस्त्यावरून ऊस वाहतूक, शेती मालवाहतूक, शाळकरी मुले दररोज ये-जा करतात. रस्त्याच्या दुतर्फा बाजूला काटेरी झाडीझुडपी वाढलेली आहेत. त्यामुळे समोरचा रस्ता दिसत नसल्याने अपघाताच्या घटना घडताहेत. नवीन रस्ता करावा, अशी मागणी वाहनधारकांतून होत आहे.
सातनदुधनी पुलावरील रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी
उडगी: अक्कलकोट तालुक्यातील सातनदुधनी येथील बोरी नदीच्या पुलावरून मैंदर्गीला जोडणारा रस्ता वाहून गेला आहे. यंदा अतिवृष्टीमुळे बोरी नदीला महापूर आल्याने आणि या पुलावरून जाणारा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता लवकरात लवकर करण्याची मागणी होत आहे.
कारखान्याला जोडणारे रस्ते करा
चपळगाव : सध्या सगळीकडे साखर कारखान्यांच्या धुराडी पेटलेल्या आहेत. कुरनूर धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर ऊसाचे उत्पादन घेतले जाते. या ठिकाणाहून सोलापूर, आचेगाव, दुधनी, भुसनूर, धोत्री, तडवळ या भागातील कारखान्यांना चपळगाव मार्गे उसाची वाहतूक होते. यामुळे चपळगावला जोडणारे रस्ते खराब होत आहेत. हे खराब रस्ते दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
चपळगाव परिसरात तुरीचा साठा
चपळगाव : चपळगाव परिसरात दरवर्षी तुरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. यावर्षी तुरीला ६ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. लागवडीचा खर्च लक्षात घेऊन काही शेतक-यांनी अद्याप तुरीची विक्री केली नाही. काही दिवसांनी तुरीची किमत वाढेल या आशेने अनेक शेतक-यांनी उत्पादित केलेली तूर घरीच साठवून ठेवली आहे.
कुर्डूवाडीतील पुलाच्या कामासाठी वाहतूक मार्गात बदल
कुर्डूवाडी : येथील नगरपालिका हद्दीत माढा रस्त्यावरील नाल्यावर पुलाच्या कामाला सुरुवात होत आहे. त्यामुळे हा रस्ता २४ जानेवारीपासून वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. व त्यामुळे दुचाकी व तीन चाकी वाहनांसाठी पर्यायी रस्ता म्हणून पंचायत समिती ते मुस्लीम कब्रस्तान, लक्ष्मी नगर ते माढा रोड रस्ता या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. जड वाहने ही पर्यायी कुर्डूवाडी-बार्शी बायपास मार्गाने वळविण्यात येत असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.
कुर्डूवाडीत गटारीच्या कामानंतर होणार रस्ते
कुर्डूवाडी : कुर्डूवाडी शहरातील अंतर्गत गटारीची सुरू असलेली कामे पूर्ण झाल्यानंतर अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडे तब्बल ६० कोटी रुपयांची मागणी करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले. सध्या अंतर्गत गटारीच्या कामामुळे त्यातून निर्माण होणा-या धुळीमुळे त्रास होतोय. परंतु शहरात विकास कामे करण्यासाठी थोडे दिवस सर्वांना हे सहन करावे लागणार असल्याचे भूमकर यांनी सांगितले.
अर्जुनसोंडमध्ये काँक्रिट रस्ते करण्याची मागणी
लांबोटी : अर्जुनसोंड (ता. मोहोळ) येथील मागासवर्गीय वस्तीमधील रस्ते खराब झाले आहेत. या वस्तीमधील कॉंक्रिट रस्ते करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. अंतर्गत खराब रस्त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
स्मशानभूमीतील काटेरी झुडपे काढण्याची मागणी
लांबोटी : मोहोळ तालुक्यात अर्जुनसोंड येथील स्मशानभूमीत (सीना नदी) जाणा-या रस्त्याच्या कडेला काटेरी झाडे वाढली आहेत. ती झाडे काढण्याची मागणी नागरिकातून होत आहे. ही काटेरी झाडे स्मशानभूमीच्या दुरवस्थेत भर घालताहेत.