उद्यान, गोलगुंबज अन् सिद्धेश्वर एक्सप्रेस दहा दिवस हाऊसफुल्ल
By Appasaheb.patil | Published: November 21, 2020 01:21 PM2020-11-21T13:21:27+5:302020-11-21T13:29:22+5:30
सोलापूर रेल्वे स्थानकावर गर्दी; दिवाळी सुट्यांमुळे प्रवासी संख्येत वाढ
सोलापूर : दिवाळी सुट्यांमुळे मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील सर्वच स्थानकांवर प्रवाशांनी मोठी गर्दी केली आहे. मागील पंधरा दिवसांपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवासीसंख्येत वाढ झाली. सोलापूर विभागातून धावणारी उद्यान, गोलगुंबज अन् सिद्धेश्वर एक्सप्रेसचे आरक्षण फुल्ल झाल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
मध्य रेल्वे विभागातील सर्वात महत्त्वाचे स्थानक म्हणून सोलापूर रेल्वे स्थानकाला ओळखले जाते. कर्नाटक, आंध्रप्रदेश, मराठवाड्याला जोडणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग म्हणून सोलापूरला ओळखले जाते. दिवाळीनिमित्त सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या सर्वच एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत. सोलापूरमार्गे म्हैसूरला जाणारी गोलगुंबज एक्सप्रेसला सर्वाधिक प्रवाशांची गर्दी आहे. याशिवाय मुंबईहून बेेंगलोरला जाणारी उद्यान एक्सप्रेस व सोलापूर ते मुंबई नियमित धावणाऱ्या सिद्धेश्वर एक्सप्रेसच्या सर्वच सीटचे आरक्षण फुल्ल झाले आहे.
दरम्यान, बेंगलोरमार्गे नवी दिल्ली धावणारी कर्नाटक एक्सप्रेस व गदगहून मुंबईला जाणारी गदग एक्सप्रेस, हैद्राबादहून मुंबईला जाणाऱ्या हुसेनसागर एक्सप्रेस गाडीलाही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दिवाळी सुटीनिमित्त प्रवासी पर्यटन, धार्मिकस्थळांना भेटी देण्यासाठी प्रवास करीत आहेत.
या गाड्यांमध्ये आरक्षण फुल्ल
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी उद्यान, गोलगुंबज, सिद्धेश्वरबरोबरच गदग व हुसेनसागर, कर्नाटक एक्सप्रेस गाडीचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दिवाळी सुटीनिमित्त प्रवासी पर्यटन, देवदर्शनासह वैयक्तिक कामानिमित्त रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास करीत आहेत.
जिल्ह्यात रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ
दिवाळीमधील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाच्या रेल्वे गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. गाडी क्रमांक ०२०३१-०२०३२ पुणे-गोरखपूर-पुणे फेस्टिव्हल गाडी २३ नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहे. ही एक्सप्रेस आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे.
महत्त्वाच्या गाड्यांच्या वेळा
- सिद्धेश्वर एक्सप्रेस १०.५५ - ०६.५० (सोलापूर ते मुंबई)
- उद्यान एक्स्प्रेस ११.२० - ११.३० (मुंबई ते बेंगलोर)
- गोलगुंबज एक्सप्रेस ०२.१० - ०२.१५ (सोलापूर ते म्हैसूर)
- गदग एक्सप्रेस ०५.२० - ०५.२५ (गदग ते मुंबई)
- हुसेनसागर एक्सप्रेस ०५.२५ - ०५.३५ (हैद्राबाद ते मुंबई)