उजनी धरण बॅकवॉटर बोट दुर्घटना; बुडालेल्या सहा जणांची नावे आली समोर; शोध कार्य पुन्हा केले सुरु
By Appasaheb.patil | Published: May 22, 2024 09:39 AM2024-05-22T09:39:00+5:302024-05-22T09:39:28+5:30
शोध कार्यासाठी एनडीआरएफ ची टीम दाखल.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर : इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे येत असलेली बोट पाण्यात बुडाल्याने सहा ते सात प्रवासी बुडाल्याची दुर्घटना मंगळवारी घडली. बुधवारी सकाळी त्या बुडालेल्या सहा जणांची नावे समोर आली असून बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बुधवारी पुन्हा शोध कार्य मोहीम सुरू झाली आहे.
गोकुळ दत्तात्रेय जाधव (वय ३०), कोमल दत्तात्रय जाधव (वय २५) शुभम गोकुळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकुळ जाधव (वय ३) (सर्व रा.झरे ता.करमाळा), अनुराग अवघडे (वय ३५) गौरव धनंजय डोंगरे (वय १६ दोघे रा.कुगाव ता.करमाळा) अशी पाण्यात बुडालेल्या सहा जणांची नावे आहेत.
उजनी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये आज मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाली. यातून एकाने पोहत आपला जीव वाचविला. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती मात्र अंधारामुळे शोध कार्य थांबविण्यात आले होते मात्र पुन्हा बुधवारी सकाळी ही शोध मोहीम सुरू करण्यात आली असून ग्रामस्थ, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळावर उपस्थित आहेत.