उजनी धरण, तलाव कोरडेच
By admin | Published: July 18, 2014 01:29 AM2014-07-18T01:29:18+5:302014-07-18T01:29:18+5:30
पावसाळ्यात पाणीसाठा घटतोय : समस्या होणार कठीण
सोलापूर: भरवशाच्या चार नक्षत्रांचा म्हणावा तसा पाऊस न झाल्याने जिल्ह्यातील पाणीसाठे धोक्यात आले आहेत. उजनी धरणाचा पाणीसाठा दररोज घटत असून, मध्यम व लघू प्रकल्पांतील पाण्याचीही वाढ होत नाही. मागील तीन वर्षांपासून जिल्ह्यातील अनेक तलाव कोरडेच आहेत.
सोलापूर जिल्ह्यात मागील वर्षी जूनपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली होती. जरी मोठा पाऊस झाला नसला तरी किमान जमिनीतील पाणीपातळी वाढण्यायोग्य पाऊस पडत होता. पावसाळ्याच्या शेवटी-शेवटी सप्टेंबरमध्ये काही भागात मोठा पाऊस झाल्याने तलावातील पाणी साठ्यात वाढ झाली होती. पुणे व सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस पडत राहिल्याने उजनी धरणात पाणी साठ्यात दररोज भर पडत होती. यंदा याउलट चित्र आहे. उजनी धरणाचा पाणीसाठा दररोज अंशत: कमी होत आहे. असेच चित्र मध्यम व लघू प्रकल्पांचे आहे. जिल्ह्यातील ८ पैकी एकरुख, मांगी, बुद्धेहाळ हे मध्यम प्रकल्प कोरडे असून, आष्टी तलावात २६ टक्के, हिंगणी तलावात १३ टक्के, पिंपळगाव ढाळेत १६ टक्के तर जवळगाव तलावात ६ टक्के पाणीसाठा आहे.
------------------------
४८ तलाव कोरडे ठणठणीत
जिल्ह्यातील ५३ पैकी पाच लघू प्रकल्पांत सध्या पाणीसाठा आहे. उर्वरित सर्वच ४८ तलाव कोरडे आहेत. होटगी तलावात २४.३७ टक्के, बीबीदारफळ तलावात १९.४२ टक्के, पाथरी तलावात ६८.५१ टक्के, कोरगाव तलावात २.४७ टक्के तर चारे तलावात ६.३६ टक्के पाणीसाठा आहे. अक्कलकोट, करमाळा, माढा, सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील सर्वच तलाव कोरडे ठणठणीत आहेत.
---------------------------
मागील वर्षी ८ जून रोजी वजा ५० टक्क्यांवर गेलेली उजनी धरणाची पाणीपातळी १५ जुलै रोजी वजा १५.४९ टक्क्यांवर आली होती.
पुणे जिल्ह्यातून पाण्याचा प्रवाह वाढत असल्याने कॅनॉल व नदीद्वारे सहा हजार ७०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते़
यंदा पावसाळा सुरु झाल्यानंतर दररोज उजनीचा पाणीसाठा कमी होत आहे. मंगळवारी वजा २६.५३ टक्के पाणीपातळी होती़
दौंडवरुन ७४१० क्युसेक्स तर बंडगार्डनवरुन ८४३६ क्युसेक्सचा विसर्ग उजनीत सुरू होता.
यंदा आजअखेर उजनी धरणाच्या पाणी साठ्यात किंचितही वाढ झालेली नाही़