उजनी धरणाचे पाणी उपसून हिप्परगा तलावात सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 03:01 PM2019-08-06T15:01:45+5:302019-08-06T15:04:33+5:30

इतिहासात पहिल्यांदा नियोजन; पाणीपुरवठा विभागाकडून यंत्रणा उभारणीचा प्रस्ताव

The Ujani dam will drain the water and release it into the Hipparurga Lake | उजनी धरणाचे पाणी उपसून हिप्परगा तलावात सोडणार

उजनी धरणाचे पाणी उपसून हिप्परगा तलावात सोडणार

googlenewsNext
ठळक मुद्देउजनी धरणातून भीमा नदीसह कालव्यांना पाणी सोडण्यात येत आहेकारंबा कॅनॉलचा टेलएंड हिप्परगा तलावाजवळ आहेमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पंपिंग करून तलावातील इंटकवेलपर्यंत सोडण्याचा प्रस्ताव तयार केला

राकेश कदम 

सोलापूर : उजनीच्या डाव्या कालव्यातून कारंबा शाखेला सोडलेले पाणी पंपिंग करून हिप्परगा तलावात घेण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे. यासाठी प्रशासनाने पंपिंग मशीन, चर खोदाई आणि ट्रान्स्फॉर्मर खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. मनपा आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. हिप्परगा तलावात पाणी आल्यास शहराला दोन किंवा तीन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे. 

उजनी धरणातून भीमा नदीसह कालव्यांना पाणी सोडण्यात येत आहे. डाव्या कालव्यातून सोडलेले पाणी मोहोळ तालुक्यातील सौंदणे येथे पोहोचल्यानंतर बेगमपूर आणि कारंबा शाखा कॅनॉलला सोडले जाते. कारंबा कॅनॉलचा टेलएंड हिप्परगा तलावाजवळ आहे. मात्र येथून थेट तलावात पाणी येत नाही. पंपिंग करून तलावात घ्यावे लागते. पावसाळी अधिवेशनात शहर पाणीपुरवठ्याच्या मुद्यावरून गदारोळ झाला होता. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बैठक घेतली होती. 

या बैठकीत मनपा आणि जलसंपदा विभागातील अधिकाºयांनी उजनीचे पाणी हिप्परगा तलावात घेता येईल, असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर आता काम सुरू झाले आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पंपिंग करून तलावातील इंटकवेलपर्यंत सोडण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. मनपा आयुक्त दीपक तावरे यांच्याकडे या विषयावर चर्चा होणार आहे. सध्या पूरस्थिती आहे. उजनीतील बहुतांश पाणी भीमा नदीत वाहून जाणार आहे. हे पाणी हिप्परगा तलावात घेतल्यास शहराचा भविष्यातील पाणीपुरवठ्याचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहेत. 

कॅनॉलपासून इंटकवेलपर्यंत चर खोदणार
- कॅनॉलमधून पाणी उपसा केल्यानंतर ते इंटकवेलपर्यंत यावे, यासाठी एक चर खोदण्यात येईल. इंटकवेलजवळ गाळ आहे. गाळ काढणे आणि चर खोदण्यासाठी १८ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाने सलग २० दिवस ८० एमएलडी पाणी द्यावे, अशी मनपाची मागणी आहे. नवीन पंपिंग मशीन खरेदी करणे व इतर कामांसाठी १९ लाख, तलावात चर खोदण्यासाठी १८ लाख, ट्रान्स्फॉर्मर यार्ड व ट्रान्स्फॉर्मर खरेदी ९ लाख रुपये असा ४६ लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. पंपिंगसाठी १० अश्वशक्तीचे ३० पंप, ३० अश्वशक्तीचे चार पंप घेण्यात येणार आहेत. मनपा आयुक्तांच्या अधिकारात या कामाला तातडीने मंजुरी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 

मनपा पदाधिकाºयांचे दुर्लक्ष 
- कारंबा शाखा कॅनॉलचे पाणी हिप्परगा तलावात घेण्यासाठी २०१५ मध्ये प्रयत्न झाले होते. मुंबईतील बैठकीनंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सोलापुरात बैठक घेऊन कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. जुलै महिन्यात यावर काम झाले असते तर आता डाव्या कालव्याचे पाणी हिप्परगा तलावात आले असते. सत्ताधारी भाजप पदाधिकाºयांनी यासाठी पाठपुरावा केला नाही. आता महापालिकेने तयारी केली असली तरी वीज वितरण विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. वीज वितरणच्या अधिकाºयांनी लवकर मंजुरी दिली तरच हिप्परगा तलावात पाणी येईल, असे मत पाणीपुरवठा विभागातील अधिकाºयांनी व्यक्त केले. 

दहा वर्षांपासून तलाव कोरडाच
- उजनी ते सोलापूर जलवाहिनी, औज बंधारा आणि हिप्परगा तलाव हे शहर पाणीपुरवठ्याचे मुख्य स्रोत आहेत. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून हिप्परगा तलावात फारसे पाणी नसते. डिसेंबरनंतर तलाव कोरडाच पडतो. मनपा पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिप्परगा तलावाची क्षमता दोन टीएमसी आहे. तलाव भरल्यास शहराला दीड वर्षे पुरेल इतके पाणी मिळेल. २००८ पासून तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. यंदा पावसाला सुरुवात होऊनही तलाव कोरडाच आहे. हिप्परगा तलावातून भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात पाणी घेतले जाते. 

उजनी कॅनॉलचे पाणी हिप्परगा तलावात घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. लवकरात लवकर हा प्रस्ताव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
- दीपक तावरे, आयुक्त, मनपा. 

Web Title: The Ujani dam will drain the water and release it into the Hipparurga Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.