उजनी संघर्ष समिती वाजवणार आमदारांच्या दारात हलग्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:22 AM2021-05-14T04:22:25+5:302021-05-14T04:22:25+5:30
मंगळवेढा : उजनी हे सोलापूरकरांच्या हक्काचे धरण आहे. या उजनीवर जिल्ह्यातील कुणाचाही अधिकार नाही. बारामतीकरांनी सोलापूर जिल्ह्यावर जाणूनबुजून ...
मंगळवेढा : उजनी हे सोलापूरकरांच्या हक्काचे धरण आहे. या उजनीवर जिल्ह्यातील कुणाचाही अधिकार नाही. बारामतीकरांनी सोलापूर जिल्ह्यावर जाणूनबुजून अन्याय केला आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जिल्ह्यातील एकही आमदार छातीठोकपणे बोलायला तयार नाही. म्हणून या आमदारांना जागे करण्यासाठी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने स्थानिक कार्यकर्त्यांना व शेतकऱ्यांना सोबत घेऊन १७ मे रोजी जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या दारात हलग्या वाजवून त्यांना जागे करणार असल्याचे उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी सांगितले.
मंगळवेढा ३५ गाव पाणी संघर्ष समितीच्या वतीने उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची बैठक हुन्नूर (ता. मंगळवेढा) येथे आयोजित केली होती. या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीस सचिव माउली हळणवर, उपाध्यक्ष ॲड. बापूराव मेटकरी, सदस्य धनाजी गडदे, दीपक भोसले, दीपक वाडदेकर उपस्थित होते.
या वेळी बोलताना दीपक भोसले म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद न देण्यामागे महाविकास आघाडीचे षडयंत्र उघडे पडले आहे. जिल्ह्याला जर मंत्रिपद दिले असते तर कदाचित याला विरोध केला असता. मात्र आज ५ टीएमसी पाणी चोरून नेण्याचा निर्णय होईपर्यंत एकालाही माहीत नव्हते. आज माहीत झाले तर कोणी तोंड उघडायला तयार नाही. त्यामुळे हे पाच टीएमसी पाणी आमच्या हक्काचे आहे.
या वेळी किरण भांगे, रुक्मिणी दोलतडे, मेजर बिराप्पा दोलतडे, आप्पासाहेब मेटकरी, यल्लाप्पा पडवळे, भागवत सुमते, संतोष मेटकरी, नवनाथ पुजारी, विनायक पुजारी, श्यामराव रेवे, यशवंत बिचुकले, देवा पुजारी, ओंकार पडवळे, राहुल शिंदे, महादेव शिंदे, वसंत अमनगे, समाधान मेटकरी, आनंदा पुजारी, देवाप्पा पुजारी, दत्ता काळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
---
उजनीमध्ये पाणी शिल्लक नसताना केवळ जिल्ह्याला वेठीस धरायचे म्हणून पाणी उचलण्याचा डाव आखला जात आहे. तो कधीही सहन करणार नाही. उजनी जलाशय फक्त सोलापूरकरांच्या हक्काचे आहे. कोणत्याही स्थितीत उजनीचे पाणी जाऊ देणार नाही. पाणी न्यायचे असेल तर मावळप्रमाणे सोलापुरातील शेतकऱ्यांवर गोळ्या झाडाव्या लागतील.
- माउली हळणवर
सचिव, उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समिती