उजनी पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण,३६ तासांनंतर पहिला पंप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 05:53 PM2017-10-27T17:53:37+5:302017-10-27T17:56:22+5:30
उजनी पाईपलाईनची गळती थांबविण्यासाठी अमृत योजनेतून हाती घेण्यात आलेल्या दुरुस्तीचे काम ३६ तासांनंतर पूर्ण झाले असून, सायंकाळी ५ वाजता पहिला पंप सुरू करण्यात आला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २७ : उजनी पाईपलाईनची गळती थांबविण्यासाठी अमृत योजनेतून हाती घेण्यात आलेल्या दुरुस्तीचे काम ३६ तासांनंतर पूर्ण झाले असून, सायंकाळी ५ वाजता पहिला पंप सुरू करण्यात आला.
उजनी पाईपलाईनला गळती असल्याने अमृत योजनेतून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. बुधवारी पहाटे ५ वाजता उजनी येथील उपसा बंद करण्यात आला होता. सकाळी ८ च्या सुमारास विविध ठिकाणी २५ व्हाल्व्ह बदलण्याचे काम एकाच वेळी करण्यास सुरुवात केली. वास्तविक पाहता हे काम अवघ्या ३० तासात संपवण्याचे लक्ष्य होते. मात्र काम वाढल्याने ४८ तासांचा अवधी महापालिका प्रशासनाकडून देण्यात आला होता. दुरुस्ती करणाºया कंपनीच्या कर्मचाºयांनी व महापालिकेच्या कर्मचारी अधिकाºयांनी हे काम ३६ तासात पूर्ण केले. गुरुवारी सायंकाळी पहिला पंप सुरू करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक अर्ध्या तासाच्या अंतराने चारही पंप सुरू करण्यात आले. रात्री ८ वाजता सर्व पंप सुरू झाले. रात्री ९.३० वाजता पाकणी येथील पंपाला पाणी पोहोचले, रात्री १० नंतर पाकणी येथील पंप सुरू करण्यात आला. त्यानंतर हे पाणी शहराला पोहोचले. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरू आहे.
------------------------
सोमवारपासून पाणीपुरवठा सुरळीत
दुरुस्तीसाठी शटडाऊन घेण्यात आल्याने बुधवारपासून सर्व शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे गेला आहे. शहराला तीन दिवसा आड पाणीपुरवठा होतो. शुक्रवारपासून हा पाणीपुरवठा होणार आहे. सोमवारपर्यंत हा पाणीपुरवठा सुरळीत होईल.