‘उजनी’ पोहोचली शंभरीच्या उंबरठ्यावर; ९५ टक्के पाणीसाठ्याने धरण हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2021 03:57 PM2021-10-03T15:57:42+5:302021-10-03T15:57:48+5:30
९५ टक्के पाणीसाठा : मात्र आऊट गोईंग बंद, शेतकरी वर्गातून आनंद
टेंभुर्णी : मागील ४८ तासांत उजनी धरणात सुमारे दोन टीएमसी पाणी आल्याने धरणातील पाणीसाठा तीन टक्क्याने वाढून धरण ९५.३९ टक्के भरले आहे. उजनी धरणाने ९५ टक्क्यांची पातळी ओलांडल्याने शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करीत असले तरी धरणातून आऊट गोईंग मात्र जवळपास पूर्णपणे बंद आहे.
मागील वर्षी उजनी धरण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच भरले होते. चालू वर्षी मात्र ते बरेच दिवस ८० टक्के यावरच रेंगाळत असल्याने शेतकरी वर्गातून काहीशी चिंता व्यक्त केली जात होती. आता धरण ९५ टक्के भरल्याने उर्वरित काळात ते शंभर टक्के भरणार याची खात्री निर्माण झाल्याने सर्वच स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता उजनी धरण ९२.४७ टक्के भरले होते. शनिवारी सायंकाळी धरण ९५ टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. म्हणजे मागील ४८ तासांत तीन टक्क्याने वाढ झाली आहे.
उजनी धरण क्षेत्रात आतापर्यंत एकूण ४६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी एका दिवसात १२ मिमी पाऊस पडला. उजनी धरणाच्या वरील बाजूस भीमा नदीवर असलेल्या १९ धरणांपैकी बहुतेक धरणे शंभर टक्के भरल्याने या धरणातून वेळोवेळी पाणी सोडलेले उजनी धरण १०० टक्क्यांकडे वाटचाल करीत आहे. शुक्रवारी सायंकाळी दौंड येथून ४०५८ क्युसेक विसर्ग चालू होता. त्यामध्ये शनिवारी थोडी वाढ झाली असून, सायंकाळी ४९०५ क्युसेक विसर्ग चालू आहे, तर बंडगार्डन येथून २९१६ क्युसेक विसर्ग चालू आहे.
उजनी धरण शंभरीकडे वाटचाल करीत असले तरी धरणातून आऊट गोईंग मात्र जवळपास पूर्णपणे बंद आहे. सीना माढा उपसा सिंचनसाठी २५९ क्युसेक, तर दहिगाव उपसा योजनेसाठी ६३ क्युसेकने पाणी वापरले जात आहे.