उजनीचे पाणी आज भवानी पेठ जल केंद्रात पोहोचणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:47 AM2019-08-09T11:47:22+5:302019-08-09T11:49:33+5:30
ऐतिहासिक नियोजन : मनपाने कारंबा पंपहाउसवर युद्धपातळीवर उभारली यंत्रणा, ४० हून अधिक कर्मचारी कार्यरत
सोलापूर : उजनी धरणाचे पाणी शनिवारी सायंकाळपर्यंत महापालिकेच्या भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारंबा शाखा कालव्यावर युद्धपातळीवर यंत्रणा उभारली आहे. याशिवाय कालव्याचे पाणी थेट हिप्परगा तलावात घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने कारंबा शाखा कालव्यावर पंपिंगची यंत्रणा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत उजनीचे पाणी हिप्परगा तलावात पोहोचणार आहे. इतिहासात प्रथमच उजनीचे पाणी हिप्परगा तलावात येणार आहे.
शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनीचे पाणी हिप्परगा तलावात घेण्याचे नियोजन दोन वर्षांपासून सुरू आहे. मनपाच्या वतीने कारंबा शाखा कालव्यावर पंपिंगची यंत्रणा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ५४ लाख रुपयांची तरतूद केली. मनपाच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत तातडीने या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कारंबा शाखा कालव्यावर पंपिंग यंत्रणा उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उजनी धरणावरील दुबार पंपिंगची यंत्रणा या ठिकाणी आणली. कंत्राटदाराकडून पंपिंगची यंत्रणा उभारण्यात येत आहे. कंत्राटदाराचे २५ कर्मचारी, मनपाचे १० कर्मचारी, चार उपअभियंता, सहायक अभियंता या कामावर लक्ष ठेवून आहेत. पाणी उपसा करण्यासाठी ३० अश्वशक्तीचे चार पंप आणि दहा अश्वशक्तीचे ३० पंप लावण्यात येणार आहेत.
वीज वितरणासाठी गुरुवारी ट्रान्स्फॉर्मर लावण्यात आला आहे. उजनीचे पाणी गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत हिप्परगा तलावाजवळ पोहोचले होते. पंपिंगची कामे करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागेल. कालव्यातील पाणी रविवारपासून उपसा करून हिप्परगा तलावाच्या इनटेकवेलजवळ सोडण्याचा प्रयत्न असल्याचे मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले. इनटेकवेलचे पाणी उताराने थेट भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचणार आहे. उजनीतून सलग २० दिवस पाणी घेण्यात येणार आहे.
तलावात साडेतीन किलोमीटर चर खोदणार
- कालव्यातील पाणी उपसा करुन थेट इनटेकवेलजवळ सोडण्यासाठी हिप्परगा तलावात साडेतीन किलोमीटरची चर खोदण्यात येणार आहे. इनटेकवेलजवळ गाळ साचला आहे. गाळ काढण्यासाठी इनटेकवेलजवळ १३ फूट खोदाई करण्यात येत आहे. त्याची रुंदी दोन्ही बाजूंनी दहा-दहा मीटर असेल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख संजय धनशेट्टी यांनी सांगितले. चर मारण्याच्या कामासाठी दोन दिवस लागतील.
मनपा ‘बीपीटी’जवळ कालवा अडविणार
- - कारंबा शाखा कालव्याच्या हिप्परगा तलावाजवळ दोन वितरिका आहेत. पहिल्या वितरिकेचे पाणी मनपाच्या हिप्परगा तलावाजवळील बे्रक प्रेशर टॅँकजवळ येते. तिथून पुढे शेळगी नाल्याकडे जाते.
- - मनपा ब्रिटिश प्रेशर टॅँकजवळ कालवा अडविणार आहे. या ठिकाणी ३० अश्वशक्तीच्या तीन पंपांच्या साहाय्याने पाणी उपसा करुन ब्रेक प्रेशर टॅँकमध्ये सोडले जाईल. बीपीटीतून हे पाणी उताराने थेट भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात येईल.
- - शनिवारी पहाटेपर्यंत पाणी पोहोचणार आहे. सायंकाळपर्यंत ते भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचणार आहे.