उजनीचे उचल पाणी मिळण्याच्या आशा बळावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:17 AM2021-05-03T04:17:08+5:302021-05-03T04:17:08+5:30
सांगोला तालुक्यातील शेतकरी शेतीला पाणी मिळावे म्हणून कायम संघर्ष करत आला आहे. त्यामुळे गेली ५० ते ५५ वर्षे ...
सांगोला तालुक्यातील शेतकरी शेतीला पाणी मिळावे म्हणून कायम संघर्ष करत आला आहे. त्यामुळे गेली ५० ते ५५ वर्षे टेंभू, म्हैसाळ, नीरा उजवा कालवा आणि सांगोला उपसा सिंचन योजना अर्थात उजनीच्या उचल पाण्यावर शेतीच्या पाण्यावर निवडणुका लढवल्या आहेत. टेंभू, म्हैसाळ या योजना मार्गी लागल्या असल्या तरी काहीअंशी कामे बाकी आहेत.
युती सरकारच्या काळात सन १९९५ साली आ. शहाजीबापू पाटील सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करीत होते. आ. पाटील हे सांगोल्याला टेंभू, म्हैसाळ, उजनीचे उचल पाणी शेतीला मिळावे म्हणून सरकारकडे पाठपुरावा करत होते. तत्कालीन जलसंपदामंत्री महादेव शिवणकर यांनी १९९६-९७ साली सांगोला उपसा सिंचन योजना उजनीच्या ३.८१ टीएमसी उचल पाण्यास मंजुरी दिली होती.
त्यानंतर २००१ साली प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मंजूर ३.८१ टीएमसीतून १.८१ टीएमसी पाणी परंडा तालुक्याला दिले होते. त्यामुळे सांगोल्याचे १.८१ टीएमसी पाणी कमी झाले. मंजूर पाणी तोंडले-बोंडले येथून उचलून मगराचे निमगाव महालिंगराया टेकावर टाकून ते नीरा उजवा कालव्यातून सांगोल्याला द्यायचे नियोजन केले होते; परंतु ते रद्द केले. सन २००१ साली सांगोला तालुक्यासाठी हेच पाणी धानोरे ते साळमुख, अशी पाइपलाइन करून नीरा उजवा कालवा फळवणी येथे टाकून पुढे सांगोल्याला देण्याचे नियोजन करून अंदाजपत्रकात ७५ लाख रुपये मंजूर झाले. त्यानंतर या योजनेचा कोणताच पाठपुरावा न झाल्यामुळे व प्रशासकीय मान्यता मिळूनही काम न चालू झाल्यामुळे या योजनेची मान्यता रद्द झाली होती.
सुधारित प्रस्तावाला मान्यता मिळेल
सांगोल्याच्या हक्काच्या उजनीतील २ टीएमसी पाण्याला धक्का लागलेला नाही. मंगळवेढा कार्यकारी संचालक जोशी यांच्याकडून सांगोला उपसा सिंचन योजनेच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी मंगळवेढा कार्यालयातून सदरचा प्रस्ताव सिंचन भवन, पुणे या कार्यालयाकडे पाठवला आहे. लवकरच सुधारित प्रस्तावास मान्यता मिळेल. त्यानंतर उजनी उचल पाणी योजना मार्गी लागेल, असे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.
दोन वेळा मंत्रीपद मिळूनही योजना मार्गी लागली नाही
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना तालुक्यातील जनतेने एक नव्हे, दोन नव्हे तब्बल ११ वेळा केवळ शेतीच्या पाणी प्रश्नावर निवडून दिले. महाराष्ट्र सरकारमध्ये दोन वेळा मंत्रीपदाची संधी मिळूनही सांगोला उपसा सिंचन योजना (उजनी उचल पाणी) मार्गी लावता आली नाही, हे सांगोल्याचे दुर्दैवच म्हणावे लागेल, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांतून उमटत आहेत.