उजनीत येतोय दौंडमधून १४,७५६ क्यूसेकनी विसर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:26 AM2021-09-14T04:26:55+5:302021-09-14T04:26:55+5:30
भीमानगर : पुणे जिल्ह्यातील धरणपट्ट्यात गेली तीन दिवस झाले पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुळा-मुठामधून सोडण्यात आलेले पाणी ...
भीमानगर : पुणे जिल्ह्यातील धरणपट्ट्यात गेली तीन दिवस झाले पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुळा-मुठामधून सोडण्यात आलेले पाणी व खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे दौंडमधून येणारा विसर्ग १४ हजार ७५६ क्यूसेक्सवर गेला आहे, तर मोठ्या प्रमाणावर येत असलेल्या विसर्गामुळे उजनीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. उजनीने ७० टक्क्यांचा पल्ला गाठला आहे.
गेल्यावर्षी आजच्या दिवशी उजनीची टक्केवारी १०९ टक्के होती.
सध्या उजनीत मोठ्या प्रमाणावर येत असलेल्या विसर्गामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे. कारण पावसाचे दिवस थोडे राहिले असताना मागील आठवड्यात उजनीत पाणीसाठा फक्त ६० टक्के एवढा होता. मागील चार दिवसांत उजनीत मोठ्या प्रमाणात विसर्ग येत आहे.
पवना २२००, चासकमान १९ हजार क्यूसेक, तर वरसगाव पानशेत मधूनही पाणी सोडलेले आहे. यामुळे खडकवासल्यात येणाऱ्या विसर्गात सातत्याने वाढ होत असल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे उजनीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
.......
उजनीची सद्यस्थिती
एकूण पाणीपातळी ४९५.३४५ मीटर
एकूण पाणीसाठा २८३२.१० दलघमी
एकूण पाण्याचा १००.७२ टीएमसी
उपयुक्त पाणीसाठा १०४९.२८ दलघमी
उपयुक्त पाणीसाठ्याचा ३७.०५ टीएमसी
टक्केवारी ७० टक्के
......
उजनीत येणारा विसर्ग
बंडगार्डन १४,६४५ क्यूसेक
दौंड १४,७५६ क्यूसेक
.......
उजनीतून विसर्ग
सीनामाढा उपसा २२२ क्यूसेक
दहीगाव ८४ क्यूसेक
बोगदा १५० क्यूसेक
........
नीरा खोऱ्यातील धरणे हाउसफुल्ल
नीरा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळे सर्वच धरणे हाउसफुल्ल झालेली आहेत, तर भाटघर धरण शंभर टक्के भरले आहे. धरणातून ८७०० क्यूसेक विसर्ग चालू आहे. नीरा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
नीरादेवधर धरण शंभर टक्के भरले आहे आणि धरणातून ५२०० क्यूसेक विसर्ग चालू आहे.
गुंजवणी धरणही शंभर टक्के भरले आहे तर एक हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे.
वीर धरणातून नीरा नदीमध्ये १३,९०० क्यूसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.