उजनीच्या पाण्याचा वाद; पालकमंत्री म्हणाले... यह तो ट्रेलर है. पिक्चर अभी बाकी है...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 12:23 PM2021-04-28T12:23:16+5:302021-04-28T12:23:21+5:30
सोलापुरात राजकीय संन्यास घेतो म्हणणारे पालकमंत्र्यांचे इंदापुरात वक्तव्य
सोलापूर : उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूरला पळविल्यावरून सुरू झालेल्या वादावर पडदा टाकण्यासाठी सोलापुरात राजकीय संन्यास घेण्याची भाषा करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापुरात कार्यकर्त्यांसमोर बोलताना ‘यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है’, असे म्हणत उजनीचे पाणी इंदापूर-बारामतीला कसे आणणार, या योजनांचा गौफ्यस्फोट केला आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याचे टाळले. दरम्यान जिल्ह्यात काेरोनाचा संसर्ग वाढला. रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता निर्माण झाल्याने लोकांची ओरड सुरू झाली. त्यानंतर भरणे यांनी धावतपळत तीन दिवस दौरा करून आढावा घेतला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंढरपुरात उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी लिंबोळी याेजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्याचे सांगितले. यावरून जिल्ह्यात असंतोष उफाळला.
उजनीचे पाणी इंदापूरला पळविणाऱ्या पालकमंत्री भरणे यांच्या विरोधात रोष व्यक्त होऊ लागला. सोलापूरच्या नियोजन भवनातील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भरणे यांनी हे खरे असेल तर राजकीय संन्यास घेईन, असे वक्तव्य करून प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला; पण इंदापुरात कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी केलेल्या जोषपूर्ण भाषणाची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली अन् उजनीचे पाणी पळविण्याच्या त्यांच्या चार योजनांचे बिंग समोर आले आहे. पालकमंत्री भरणे यांच्या व्हायरल क्लिपमधील संभाषणातील मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
आता खोरोची तुकाव योजना
माझे आता पावणेचार वर्षे राहिले आहेत. मला आता लढायचे आहे ते फक्त पाण्यासाठीच. इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त पाणी व चांगला बाजारभाव कसा मिळेल, यासाठी माझी लढाई आहे. लिंबोळी ‘यह तो ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है.’ बघा या तालुक्याला १०० वर्षे पुरेल, तीन पिढ्यांना पाणी कमी पडणार नाही, अशा प्रकाराच्या योजना मी आणत आहे. आता दुसरी योजना म्हणजे शेटफळमधून पाणी उचलटून गढीमध्ये टाकायचे. तेथून खडकवासलाच्या माध्यमातून सणसर कालव्याद्वारे २२ गावांमध्ये जाईल. या अधिवेशनात लाकडी लिंबोळी योजना झाली. आता पुढील अधिवेशनात खोरोची तुकाव योजना मंजूर केली जाईल.
भिगवणाला चार बॅरेजेस
भिगवणला चार बॅरेजेस बांधण्याची माझी तिसरी योजना असेल. सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडले जाते. त्यामुळे भिगवणचे बॅकवॉटर मोठ्या प्रमाणावर खाली जाते. त्यामुळे या भागात आपल्याला चार बॅरेजेस बांधावे लागणार आहेत. हे बॅरेजेस बांधल्यावर सोलापूरला कितीही पाणी सोडले गेले तरी माझ्या इंदापूरच्या शेतकऱ्याच्या पंपाचा पाइप वाढणार नाही हाही एक महत्त्वाचा विषय मी मार्गी लावणार आहे.
पुण्याचे पाणी आणणार
पुण्याचे पाणी इंदापूरला आणण्याचा माझा चौथा विषय राहणार आहे. पुणे शहर दिवसेंदिवस वाढत आहे. त्याबरोबरच आपण टेलएन्डला असल्याने गैरसोय वाढत आहे. त्यामुळे मुळशी धरणावर टाटा कंपनी वीज निर्माण करतेय. या कंपनीला वेगळा पर्याय देऊन मुळशी धरणाचे पाणी पुण्याला वापरायचे. पुण्याचे पाणी माझ्या तालुक्याला व टेल एन्डच्या गावाला कसे मिळेल, यावर भर असेल.
साताऱ्याचे पाणी तोडले
तुम्हाला माहितीय, दादांनी आपल्याला स्टेजवर सांगितले होते. तुम्ही साक्षीदार आहात. युती सरकारच्या काळात सातारा तालुक्यात आपले पाणी नेले. खासदारांनी आपले पाणी पळविले. पाणी तिकडे गेले; पण ते आपले होत. या निर्णयावर सगळीकडे मोठा गाजावाजा झाला; पण त्यावेळी तालुक्याचे कोणीच बोलले नाही. आमदार झाल्यावर २०१९ अधिवेशन मी हा मुद्दा मांडला. त्यावेळी दादा मंत्री नव्हते. त्यांना घेऊन जयंत पाटील यांच्याकडे गेलो. कमिटी नेमायला लावली. पुन्हा कोणी काही करायला नको म्हणून सगळे रीतसर केले. आपल्या हक्काचे पाणी इंदापूर-बारामतीला वळविले.