अक्कलकोटसाठी उजनीचे पाणी ठरणार मृगजळच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 04:54 PM2018-04-27T16:54:48+5:302018-04-27T16:54:48+5:30
रखडलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळाली असली तरी उजनी धरणातील पाणी कुरनूर धरणात येण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
नारायण चव्हाण
सोलापूर : रखडलेल्या एकरुख उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता (सुप्रमा) मिळाली असली तरी उजनी धरणातील पाणी कुरनूर धरणात येण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी कारंबा पंपहाऊस अडथळा ठरणार आहे. या पंपहाऊसचे काम पूर्ण झाल्याशिवाय कुरनूर धरणात पाणी सोडणे शक्य नाही, असे जलसंपदा विभागाच्या सूत्राने स्पष्ट केले आहे. त्यामुळे अक्कलकोटसाठी उजनीचे पाणी मृगजळच ठरणार असल्याचे दिसत आहे.
तब्बल नऊ वर्षे रखडलेल्या एकरुख आणि शिरापूर उपसा सिंचन योजनांना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘सुप्रमा’ देऊन हिरवा कंदील दाखविला. ‘सुप्रमा’साठी गेली नऊ वर्षे राजकीय नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली; मात्र या योजना विविध स्तरावर अडकत राहिल्या. जलसंपदा खात्याने प्रस्ताव दिल्यानंतर नाशिकच्या ‘मेरी’ या संस्थेत पाच वर्षे फाईल धूळखात पडून राहिली. कथित सिंचन घोटाळा हे त्यामागचे कारण असल्याचे सांगितले जात होते. संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘सुप्रमा’ मिळेल, अशी आशा निर्माण झाली आणि घडलेही तसेच. उच्चाधिकार समितीने शिफारस केल्यानंतर एकरुखची फाईल अर्थखात्याकडे पाच महिने पडून राहिली. सोमवारी अर्थमंत्र्यांनी या योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली.
एकरुख योजनेचे बहुतांश काम पूर्णत्वास आल्याने ‘सुप्रमा’ मिळताच तीन महिन्यांत योजना कार्यान्वित होईल, अशी स्थिती असल्याचे पूर्वी सांगण्यात आले होते; मात्र उजनी धरणातून एखरुख तलावात पाणी आणणाºया कारंबा पंपहाऊसचे काम अर्धवट स्थितीत आहे. पूर्वी सदोष काम झाल्याने ते थांबविण्यात आले होते. या कामावर साडेतीन कोटींचा खर्चही झाला; पण ते पैसे पाण्यात गेले. आता नव्याने अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया आदी सोपस्कार सुरू झाले आहेत. कारंबा पंपहाऊसचे काम पूर्ण झाल्याशिवाय उजनीचे पाणी एकरुख तलावात येणार नाही. त्यामुळे ‘सुप्रमा’ मिळाल्याचा आनंद औटघटकेचा ठरणार, अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
भीमा प्रकल्पाची सुप्रमा रखडली
- एकरुख उपसा सिंचन योजना ही स्वतंत्र असल्याने ‘सुप्रमा’ मिळताच ती तातडीने पूर्ण करण्याची घाई प्रशासनाला लागली आहे; पण भीमा-उजनी प्रकल्पांतर्गत येणाºया कारंबा पंपहाऊसचे काम मूळ प्रकल्पाला तृतीय प्रशासकीय मान्यता अद्याप मिळालेली नाही. भीमा प्रकल्पाची अद्ययावत किंमत सन २०१५-१६ च्या दरसूचीनुसार २२५० कोटी आहे. तीन वर्षांनंतर त्यात भर पडणार आहे. आता भीमा (उजनी) प्रकल्पाची ‘सुप्रमा’ अडल्याने कारंबा पंपहाऊसच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्या तरी कार्यारंभ आदेश मिळणार नाही, ही मोठी अडचण ठरणार आहे. गेले तीन महिने राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे प्रकल्प अहवाल पडून आहे. छाननीचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येते. या प्रकल्पाला सुप्रमा मिळाली तरच एकरुख योजना कार्यान्वित होणार आहे.
कारंबा पंपहाऊसविषयी...
- उजनी धरणातील पाणी कारंबा शाखा कालव्याद्वारे एकरुख तलावात येते; पण तलाव्याच्या प्रारंभी कालव्याची खोली अधिक आणि एकरुख तलाव उंचावर असल्याने कालव्यातील पाणी तलावात येऊ शकत नाही. त्यासाठी नवीन डिझाईनचे दरवाजे आणि कालव्यातून पाण्याचा उपसा करून तलावात सोडण्यासाठी कारंबा पंपहाऊस उभारणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून कारंबा पंपहाऊसच्या निविदा प्रक्रियेची चर्चा असली तरी प्रत्यक्षात या कामाला गती नाही.