सोलापूरसाठी सोडलेले उजनीचे पाणी चंद्रभागा नदीत पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:15 PM2019-03-29T12:15:21+5:302019-03-29T12:17:33+5:30
नौकाविहार सुरू ; विसर्ग वाढविल्याने पाण्याला गती
पंढरपूर : सोलापूर शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी २८ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पंढरपुरात दाखल झाले आहे़ पंधरा दिवस बंद असलेला होडीचा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याने नौकाविहारासाठी गर्दी होत असून, कोळी बांधवांतून आनंद व्यक्त होत आहे.
जानेवारी महिन्यात सोलापूरला पिण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यात आले होते़ त्यानंतर ते पाणी दोन महिने पुरले़ पुन्हा आता जशी उन्हाची तीव्रता वाढत गेली तशी शहरातील नागरिकांना पुन्हा पाणी कमी पडू लागले़ सुरुवातीला दोन दिवसाआड, पुन्हा तीन, चार आणि त्यानंतर तर पाच दिवसांनंतर पाणीपुरवठा होऊ लागला़ त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने २३ मार्च रोजी सकाळी १० वाजल्यापासून ३००० हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली, मात्र वेग कमी असल्यामुळे आणि नदीपात्र कोरडे पडल्याने ते पाणी पुढे सरकण्यास विलंब होऊ लागला़ त्यानंतर २६ मार्च रोजी त्यात वाढ करून ७१०० क्युसेकने पाणी वाढविण्यात आले़ त्यामुळे पाणी गतीने पुढे सरकू लागले़ २८ रोजी सकाळी ७ च्या सुमारास पंढरपुरात ते पाणी दाखल झाले.
हे पाणी गोपाळपूरच्या बंधाºयात धडकल्यानंतर चंद्रभागेतील पाणी पातळीत वाढ झाली़ हे पाणी भक्त पुंडलिक मंदिराच्या पायरीला टेकले आहे़ शिवाय अनेक समाधी आणि मंदिरांना पाण्याने वेढा टाकला आहे़
भाविकांना स्नानाचा आनंद..
- चंद्रभागा नदीपात्र कोरडे पडल्याने त्यातील होड्या पलीकडील तीरापर्यंत गेल्या होत्या, मात्र गुरुवारी पाणी आल्यानंतर त्या पाण्याबरोबर भक्त पुंडलिक मंदिरासमोर उभारण्यात आल्या़ गेल्या १५ ते २० दिवसांपासून कोळी बांधवांचा पाण्याअभावी व्यवसाय बंद होता़ तो आता पाणी आल्यामुळे पूर्ववत झाला आहे़ पंढरपुरात रोज येणाºया हजारो भाविकांनाही चंद्रभागेत पवित्र स्नान करता येऊ लागले़ त्यामुळे भाविकांमधून समाधान व्यक्त होऊ लागले़