बिनविरोधसाठी विरोधकांची बिनशर्त माघार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:19 AM2021-01-02T04:19:00+5:302021-01-02T04:19:00+5:30
भोसे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गोपाळराव पाटील, यशवंतभाऊ पाटील, राजूबापू पाटील यांच्यानंतर आता राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांची एकहाती ...
भोसे ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून गोपाळराव पाटील, यशवंतभाऊ पाटील, राजूबापू पाटील यांच्यानंतर आता राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांची एकहाती सत्ता आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत १७ पैकी एका उमेदवाराच्या विजयाचा अपवादवगळता विरोधकांना ग्रामपंचायतीमध्ये खातेही खोलता आले नाही. अशातच मागील पाच वर्षात ज्येष्ठ नेते यशवंतभाऊ पाटील, महादेव खटके तर कोरोनामुळे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील, कृषिराज शुगरचे चेअरमन महेश पाटील, माजी प्राचार्य अनंतराव पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष वैजिनाथ कोरके, विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक राजाराम माळी, बाळासाहेब कोरके, प्रा. डॉ. प्रकाश कोरके यांचे निधन झाले.
अशा प्रसंगी राजकारण न करता आणि खासदार संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, भोसे परिवर्तन पॅनलकडून उमेदवार न देता ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी ज्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांचा आमच्या पॅनलशी कोणताही संबंध नाही. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भोसे परिवर्तन पॅनलचे समन्वयक प्रा. महादेव तळेकर यांनी जाहीर केले आहे.
यावेळी हनुमंत मोरे, राजकुमार टरले, हरिश्चंद्र तळेकर, अजय जाधव, भास्कर तळेकर, विलास कोरके, विलास तळेकर, बाळासाहेब कोरके, ॲड. रमेश कोरके, अनिल बोराडे, औदुंबर थिटे, बाळासाहेब थिटे, नवनाथ सुरवसे आदी उपस्थित होते.