पंढरीत दुपारपर्यंत अघोषित बंद
By admin | Published: May 18, 2014 12:05 AM2014-05-18T00:05:50+5:302014-05-18T00:05:50+5:30
सकाळपासून शुकशुकाट : पेढे वाटून कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव
पंढरपूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पंढरपूर शहरात जल्लोष करण्यात आला. सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत शहरात शुकशुकाट होता़ त्यामुळे शहरात अघोषित बंदचे वातावरण होते, मात्र लोकसभेचा निकाल कळताच कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडून रस्त्यावर गुलाल व फटाके उडवून जल्लोष केला. भाजपाचे उमेदवार शरद बनसोडे हे निवडून आल्यानंतर दत्तासिंह रजपूत, डॉ. शशिकांत धायतडक, खाडिलकर, शोभा धायतडक, बनसोडे, रिपाइंचे अप्पासाहेब जाधव, बाळासाहेब कसबे, जितेंद्र बनसोडे, संतोष पवार, शिवसेनेचे शहराध्यक्ष संदीप केंदळे यांनी शहरात पेढे वाटून, गुलाल उधळून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला. त्याचबरोबर राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे व शेतकरी संघटनेचे उमेदवार सदाभाऊ खोत यांच्यात निकालाच्या विसाव्या फेरीपर्यंत थोडकाच फरक जाणवत होता. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. परंतु निकालाच्या २१ व्या फेरीत मात्र विजयसिंह मोहिते-पाटिल यांना जादा मताधिक्य मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. जशी विजयसिंह मोहिते-पाटील निवडून आल्याची बातमी समजताच पंढरपुरात स्टेशन रोड, क्रांतीसिंह नाना पाटील चौक, शिवाजी चौकात फटाके फोडण्यात आले. यावेळी राष्टÑवादीचे संतोष नेहतराव, विजय-प्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष दीपक वाडदेकर, अमोल नागटिळक, संतोष कवडे यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शहरात विविध भागात गुलाल उधळत, फटाके उडवत मिरवणूक काढली. लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते-पाटील हे निवडून आल्याचे कळताच विजय-प्रताप युवा मंचचे जिल्हाध्यक्ष दीपक वाडदेकर व राष्टÑवादीचे संतोष नेहतराव यांच्यासह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.