लसीकरणानंतर इन्फेक्शन झाल्याने दोन महिन्यांच्या बाळाचा दुदैवी मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 02:14 PM2020-09-23T14:14:29+5:302020-09-23T14:17:36+5:30
डोणगावमधील प्रकार; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर झाला अंत्यविधी
सोलापूर : लसीकरणानंतर इन्फेक्शन होऊन दोन महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील डोगणाव येथे मंगळवारी सकाळी घडली. संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मृतदेह आरोग्य केंद्रात आणला व संबंधित आरोग्यसेविकेवर कारवाई करावी आणि नुकसानभरपाईच्या मागणीसाठी ठिय्या मारला. सलगर वस्ती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी केल्यानंतर नातेवाईकांनी बाळाचा अंत्यविधी उरकला.
डोणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १५ सप्टेंबर रोजी आरोग्य सेविका विजया राऊत यांनी लसीकरण केले. यामध्ये प्रशांत मसलखांब यांच्या दोन महिन्यांच्या मुलास चुलतीने लसीकरणास नेले. त्यावेळी बाळाला ताप व सर्दीचा त्रास होता. याची कल्पना दिल्यावरही संबंधित आरोग्य सेविकेने त्या बाळाच्या मांडीला पेंटा व्हायलंट व दंडाला आयपीयूची लस दिली. लसीनंतर सायंकाळी बाळाचा ताप वाढला व मांडीला गाठ आली. सकाळी ही बाब निदर्शनाला आल्यावर नातेवाईकांनी आरोग्य सेविकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. आशा वर्करने माहिती दिल्यावर त्या आरोग्य सेविकेने तापाची गोळी दिली व बाळाला न पाहताच काही होणार नाही, असे सांगितले. गोळी दिल्यानंतरही दुपारनंतर बाळाला झटके आल्याने नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी सोलापूरला हलविले.
खाजगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर संबंधित डॉक्टरांनी इन्फेक्शन मेंदूपर्यंत पोहोचल्याचे सांगितले. बाळाची तब्येत नाजूक झाल्यावर सिव्हिल हॉस्पिटलला हलविण्यात आले. मंगळवारी सकाळी त्या बाळाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मसलखांब यांचे नातेवाईक व ग्रामस्थ जमले. सर्व जण संतप्त झाल्याचे पाहून सरपंच संजय भोसले यांनी तिºहे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गोडसे यांना संपर्क साधला. त्यावर ते तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. वरिष्ठ आल्याशिवाय आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. शेवटी नातेवाईकांनी बाळाचा मृतदेह डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून ठेवला व संबंधित आरोग्य सेविकेवर कारवाई करा, भरपाई दिल्याशिवाय मृतदेह हलविणार नाही, अशी भूमिका घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाºयांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्याला संपर्क साधला. पोलीस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली व नातेवाईकांची समजूत घातली.
सरपंच भोसले यांचा फोन आल्यावर मी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. लसीकरणानंतर गुंतागुंतीबाबत आरोग्य सेविकांनी दररोज आशा वर्करमार्फत बाळांच्या आरोग्याची माहिती घेणे बंधनकारक आहे. या प्रकरणात नेमके काय घडले याची चौकशी केली जाईल.
-डॉ. ए. ए. गोडसे