सोलापुरच्या सिध्देश्वर तलावात बुडून अज्ञात इसमाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 12:45 PM2019-06-07T12:45:33+5:302019-06-07T12:47:42+5:30
सिद्धेश्वर तलावातील मृत्यूचे सत्र सुरूच; सुरक्षारक्षक नसल्याने वारंवार घडतात घटना
सोलापूर : सिद्धेश्वर तलावातील गणपती घाटाजवळ, गणेश विसर्जन कुंडाच्या बाजूला असलेल्या पाण्यात मृत्यूचे सत्र सुरूच आहे. सुरक्षारक्षक नसल्याने वारंवार अशा घटना घडत असून, गुरुवारी पाण्यात अज्ञात इसमाचे प्रेत तरंगताना आढळून आले. गेल्या महिन्यात याच ठिकाणी निखिल उगाडे आणि सौरभ सरवदे या रविवार पेठेतील दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला होता.
गुरुवारी दुपारी १२ वाजता तलावातील पाण्यात अज्ञात इसमाचे प्रेत तरंगताना दिसून आले. बघणाºया लोकांनी सामाजिक कार्यकर्ते सचिन राठोड यांना फोन करून याची माहिती दिली.
सचिन राठोड यांनी प्रेताची पाहणी करून तत्काळ फौजदार चावडी पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी येऊन पाहणी केली, अॅम्ब्युलन्सला बोलावून घेतले. स्थानिक तरुणाच्या सहायाने व तलावाची स्वच्छता करणाºया कामगारांच्या मदतीने प्रेतास बाहेर काढण्यात आले. प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. पाण्यावर तरंगणारे प्रेत पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. गणपती घाटाच्या बाजूला असलेले पाणी खोल असून त्यात आजवर अनेक लोक मरण पावले आहेत.
दिवे, कॅमेरे बसवावेत- कुरेशी
- रात्री अनेक लोक गणपती घाटाच्या परिसरात बसतात. काही लोक मद्यपान करतात, या प्रकाराला कोणी आवर घालत नाही. ८ ते १५ दिवसात १ ते २ प्रेत या पाण्यात तरंगताना दिसतात. सुरक्षा व्यवस्था नसल्याने रात्री कोण येतं आणि जातं याचा अंदाज येत नाही. या भागात तलाव दिसेल अशा पद्धतीने मोठे लाईट दिवे लावण्यात यावेत. सीसीटीव्ही कॅमेरा लावल्यास पाण्यात पडून मरणाºयांची आत्महत्या आहे की आणखी काही प्रकार या ठिकाणी होतो हे लक्षात येईल. सुरक्षेच्या दृष्टीने गणपती घाटावर एक सुरक्षारक्षक नेमण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवासी निहाजअहमद कुरेशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
आजवर अनेक प्रेते बाहेर काढली, मला पोहता येत नाही. पोलिसांच्या विनंतीवरून मी नावेच्या सहायाने पाण्यात जातो, प्रेताला धरून बाहेर ओढत आणतो. पूर्वी तलाव पूर्ण भरलेला होता तेव्हाही अशीच स्थिती होती. आता डबक्याच्या स्वरूपात असलेल्या पाण्यातही तीच स्थिती आहे.
-संजय फुलारे, स्थानिक रहिवासी.
महिन्यातून ४ ते ५ घटनेसाठी मला स्थानिक लोकांकडून फोन येत असतो, पाहणी करून मी पोलिसांना माहिती देत असतो. रात्री-अपरात्री या भागात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे, याला आळा घालण्यासाठी या ठिकाणी २४ तास सिक्युरिटी गार्ड नेमणे गरजेचे आहे. शिवाय या परिसरात फिरण्यासाठी व बसण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांनाही मोठा त्रास होत असतो. टपोºया मुलांमुळे गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाºया लोकांनाही त्रास होतो.
-सचिन राठोड,
सामाजिक कार्यकर्ता.