कुर्डूवाडीतील एटीएम फोडून अज्ञात चोरट्यांनी पळविले ११ लाख ४२ हजाराची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 12:52 PM2020-11-25T12:52:11+5:302020-11-25T12:59:51+5:30
तब्बल चोवीस तास उलटले; तरीही पोलिसांना मात्र चोरट्यांची दिशाही सापडेना
कुर्डूवाडी : कुर्डूवाडी शहरातील माढा रोडवरील ग्रामीण रुग्णालयाच्या बाजूला असलेले बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन मंगळवारी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान गॅस कटरच्या साह्याने फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यातील ११ लाख ४२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली. दरम्यान, चोवीस तास उलटून गेले तरी त्या अज्ञात चोरट्यांचा अद्यापपर्यंत धागेदोरे पोलिसांच्या हाती आले नाहीत.
शहरातील एटीएम फोडल्याची घटना गंभीर आहे.त्याचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.यातील काही तांत्रिक बाबी समोर आल्या की त्या अज्ञात चोरट्यांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.पण आमचे पथक लवकरच संबधीत आरोपींना बेड्या ठोकणार आहे.
- चिमणाजी केंद्रे
सहायक पोलीस निरीक्षक, कुर्डूवाडी)
याबाबत सचिन सुखदेव चौधरी ( वय ३०, रा.शिरोळे,ता बार्शी) यांनी येथील पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केलेली आहे. शहरात वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माढा रस्त्यावरील बँक ऑफ इंडियाचे एटीएम हे फायनान्शियल सिस्टीम सॉफ्टवेअर कंपनीचे आहे. त्यात फिर्यादी हे एरिया मॅनेजर म्हणून काम करत आहेत.सोमवारी दुपारी ४ च्या सुमारास एटीएममध्ये सीएमएस कंपनीकडील कॅश टाकण्यासाठी कर्मचारी आश्रम बेडकूते (रा.वरकुटे, ता.करमाळा) व अनिल भाग्यवंत ( रा. झरे, ता. करमाळा) आले होते. त्या दोघांनी येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून ५ लाख रुपये काढले व सदरच्या एटीएम मशीन मध्ये भरले होते. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री १२ वाजून ५ मिनिटे ते पहाटेच्या ५ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एटीएमच्या दरवाज्यातून आत जाऊन समोरील बाजुचे मशीनचे लॉक गॅस कटरच्या सहायाने तोडून आतील सुमारे ११ लाख ४२ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली.यावेळी त्यांनी येथील कॅमेराही काढून पळवून नेला आहे.
मंगळवारी सकाळी संबंधित एटीएमची स्वच्छता करण्यासाठी अरविंद जगताप (रा. कुर्डुवाडी ता. माढा) तिथे आल्यानंतर त्यांच्या लक्षात ही घडलेली घटना आली.त्यांनी लगेच कुर्डूवाडी येथील बँक ऑफ इंडियाचे शाखाप्रबंधक उदय काकपूरे यांना घडलेल्या घटनेबाबत सांगितले. त्यानंतर काकपूरे यांनी तात्काळ पोलिसांना ही घटना कळवली.त्यावेळी घटनास्थळी लागलीच सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांनी पोलीस पथकाबरोबर भेट देऊन पाहणी केली होती व घटनेचा पंचनामा केला आहे.
चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी २ हजार रुपयांच्या ६ नोटा, ५०० रुपयांच्या २२५३ नोटा, १०० रुपयांच्या ३५ नोटा चोरुन नेल्या आहेत.तोडफोडीमूळे एटीएम मशीनचेही सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे, तर याबाबत तपास सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांचे पथक करीत आहे.