वाळूची चोरी केली म्हणून ३६ गाढवांना उटी सहलीची अनोखी भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:56 AM2021-01-13T04:56:20+5:302021-01-13T04:56:20+5:30
पंढरपुरातील सारडा भवनजवळील भीमा नदीच्या पात्रातील वाळू घेऊन जाणारी ११, जुना अकलूज रोड जॅकवेलजवळील भीमा नदीच्या पात्रातील वाळू घेऊन ...
पंढरपुरातील सारडा भवनजवळील भीमा नदीच्या पात्रातील वाळू घेऊन जाणारी ११, जुना अकलूज रोड जॅकवेलजवळील भीमा नदीच्या पात्रातील वाळू घेऊन जाणारी १८, खडकीदेवीच्या मंदिराजवळील भीमा नदीच्या पात्रातील वाळू घेऊन जाणारी सात अशा एकूण ३६ गाढवांना पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले होते.
गाढव प्राण्यांना ठेवण्यासाठी महाराष्ट्रात कोठेही कोंडवाडा नाही. यामुळे गेल्या चार दिवसांपासून ही ३६ गाढवे पोलीस ठाण्यातच ठेवण्यात आली होती. त्यांना दररोज चारा-पाण्याची व्यवस्था पोलीस कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती. ही गाढवं पळून जाऊ नयेत यासाठी दोन होमगार्ड्सचा बंदोबस्त ठेवणयात आला होता.
या कारवाई संदर्भात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त करून ३६ गाढवांना पुढील योग्य त्या सुरक्षिततेसाठी इंडिया प्रोजेक्ट फॉर ॲनिमल ॲण्ड नेचर संस्था, निलगिरी, उटी (तामिळनाडू)कडे रवाना करण्यात आले.
सशस्र पोलीस अन् डॉक्टरांचे पथक सोबत
३६ गाढवांना दोन मोठ्या वाहनात नेण्यात आले आहे. सुरक्षेचा भाग म्हणून गाढव नेणाऱ्या वाहनासह पोलीस पथक पाठवण्यात आले आहे. त्या पथकामध्ये शस्रधारी एक पोलीस हवालदार व तीन पोलीस कर्मचारी यांचा सहभाग आहे. त्याचबरोबर जनावरांवर उपचार करणारे एक डॉक्टर व संस्थेचे तीन कर्मचारी रवाना करण्यात आले आहेत.
यांनी केली कारवाई
पोलीस निरीक्षक अरुण पवार, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर, हवालदार सूरज हेंबाडे, राजेश गोसावी, शरद कदम, बिपीनचंद्र ढेरे, गणेश पवार, इरफान शेख, शोएब पठाण, सिद्धनाथ मोरे, सुजित जाधव, संजय गुटाळ, समाधान माने, सुनील बनसोडे, विजय देडे यांनी ही कारवाई केली.
फोटो ::::::::::::::::::::::::::::::
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या गाढवांना गाडीमध्ये भरताना पोलीस अधिकारी व कर्मचारी. ( छाया : सचिन कांबळे)