अनोखा विवाह; मोबाईलवरच मंगलाष्टके वाजवून स्मशानभूमीत बांधल्या रेशीमगाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:16 PM2020-07-01T17:16:57+5:302020-07-01T17:19:03+5:30
सांगोल्यातील सोहळा; वधू- वरांकडील मोजकेच वऱ्हाडी मंडळींचा सहभाग
सांगोला : लॉकडाऊनमुळे सर्वत्र विवाह सोहळ्यावर निर्बंध आले असताना तेही स्मशानभूमीत एखादा विवाह सोहळा मोबाईलवर मंगलाष्टके वाजवून अत्यंत साध्या पद्धतीने होत असेल तर कोणालाही आश्चर्य वाटेल असाच सांगोल्यातील स्मशानभूमीत दुसऱ्यांदा स्मशानजोगी समाजातील विवाह मंगळवारी झाला.
हादगाव (जि. नांदेड) येथील आई-वडिलांचे छत्र हरपलेला वर मारुती बालाजी घनसरवाडा व मनाढा ता. हदगाव जि.नांदेड येथील आईचे छत्र हरवलेली वधु दुर्गा नथु पवार या दोघांचा विवाह सांगोल्यातील स्मशानभूमीत मंगळवार ३० जून रोजी सकाळी दहाच्या सुमारास शुभ मुहूर्तावर अनावश्यक खर्च टाळून लग्नविधीची औपचारिकता पूर्ण करून मोबाईलवर रेकॉर्ड केलेली मंगलाष्टके वाजवून अवघ्या काही मिनिटात हा विवाह पार पडला. साधारण एक वर्षापूर्वी स्मशानजोगी लक्ष्मण घनसरवाड यांच्या मुलीचा विवाह याच स्मशानभूमीत पार पडला होता. त्यानंतर एक वर्षांनी या स्मशानभूमीत त्यांच्या पुतण्याचा विवाह सोहळा पार पडल्याने हा विवाह सोहळा चर्चेत आला आहे .
स्मशानभूमी हीच आपली कर्मभूमी मानणारा स्मशानजोगी समाज कोणतीही अंधश्रद्धा न बाळगता आजही आपल्या रूढी परंपरेशी बांधील असल्याचे या विवाह सोहळा दिसून येते. एक रुपये हुंडा न घेता पैशाची कुठलीही उधळपट्टी न करता अत्यंत साध्या पद्धतीने स्मशानभूमीत लग्न करण्याची या समाजाने परंपरा आजही कायम राखली आहे. समाजात देण्याघेण्याची प्रथा नाही, मुला-मुलींच्या पसंतीवरच आजही विवाह ठरवले जातात़ प्रत्येकाचा जन्म कुठे ना कुठे होत असतो, परंतु आमच्या जातीमध्ये जन्म हा स्मशानभूमीत होतो तर मृत्यूही स्मशानभूमीत होतात त्यामुळे घरातील कोणतेही कार्यक्रम स्मशानभूमीत पार पडले जातात. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊनच्या कालावधीत सरकारने विवाह सोहळ्याला निर्बंध घातले आहेत. टाळेबंदीच्या काळात कोणताही डामडौल न करता अनावश्यक खर्च टाळून अत्यंत साध्या पद्धतीने स्मशानजोगी समाजातील वर मारुती व वधू दुर्गा यांचा विवाह मंगळवारी स्मशानभूमीत पार पडला. विवाह सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तानाजी पाटील , सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब ठोकळे ,जगदीश मागाडे संतोष सागवाने , हमीद बागवान , वर पिता लक्ष्मण घनसरवाढ वधू- वरांकडील मोजकेच वऱ्हाडी मंडळी उपस्थित होते.