अनोखा विवाह सोहळा; गॅलरीतूनच वधू-वरांवर वºहाडींनी टाकल्या अक्षता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 12:04 PM2020-05-25T12:04:17+5:302020-05-25T12:05:56+5:30
सोलापुरातील ‘वसंत विहार’मधील अनोखे लग्न; कोरोनामुळे मोजकेत लोकांची होती उपस्थिती...
सोलापूर : सोलापूर शहरातील वसंत विहार परिसराच्या नजीक असलेल्या गुलमोहर अपार्टमेंट परिसरात रविवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटांच्या शुभमुहूर्तावर अनोख्या पद्धतीने आदर्शवत विवाह सोहळा पार पडला. फिजिकल डिस्टन्स पाळत... उपस्थित ५० वºहाडी मंडळीनी सॅनिटायझरद्वारे हात स्वच्छ करून आणि तोंडाला मास्क बांधून वधू-वरांवर फुलांच्या पाकळ्यांच्या अक्षता टाकल्या.
विशेष म्हणजे यावेळी गुलमोहर अपार्टमेंटमधील शेकडो रहिवाशांनी आपापल्या गॅलरीमध्ये येऊन वधू-वरांवर अक्षताची बरसात केली. गुलमोहर सोसायटीमध्ये राहणारे दशरथ माने यांची कन्या श्रद्धा हिचा विवाह सांगली -आष्टा येथील डॉक्टर विजयसिंह जाधव यांचे सुपुत्र अजिंक्य यांच्याशी सहा महिन्यापूर्वी ठरला होता. सोलापुरातील सुशील रसिक सभागृहात २४ मे रोजी धूमधडाक्यात हा विवाह सोहळा करण्याचे नियोजन केले होते. मात्र कोरोनाचे देशावर आलेले संकट आणि लॉकडाऊन यामुळे विवाह कसा करायचा याचे कोडे त्यांना पडले होते.
गुलमोहर सोसायटीमधील रहिवासी आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या संकल्पनेतून हा सोहळा गुलमोहर सोसायटीच्या प्रांगणात करण्याचे नियोजन केले आणि माने- जाधव परिवाराने याला होकार दिला. त्यामुळे रविवारी २४ मे रोजी बारा वाजून ३० मिनिटांनी गुलमोहर सोसायटीच्या प्रांगणात वधू-वरांवर अपार्टमेंटमधील शेकडो रहिवाशांनी अक्षता टाकल्या आणि वधू-वर अन् जवळ ५० जणांची उपस्थिती दर्शविली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांच्यासह मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. लॉकडाऊनमध्ये मुलीचा सुंदर विवाहसोहळा पार पाडल्याबद्दल श्रद्धा माने या वधूच्या आईने सर्वांचे आभार मानले.