पणजोबांनी वकिली केलेले न्यायालय पाहण्यासाठी ती आली अमेरिकेतून सोलापुरात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 02:18 PM2019-02-23T14:18:49+5:302019-02-23T14:21:00+5:30
सोलापूर : आपल्या पणजोबांनी ज्या न्यायालयात वकिली केली ते सोलापूर जिल्हा न्यायालय पाहण्यासाठी ती अमेरिकेतून सोलापुरात आली. अनशा भारत ...
सोलापूर : आपल्या पणजोबांनी ज्या न्यायालयात वकिली केली ते सोलापूर जिल्हा न्यायालय पाहण्यासाठी ती अमेरिकेतून सोलापुरात आली. अनशा भारत साळोखे असे तिचे नाव आहे.
अनशा ही अमेरिकेत सध्या नववीत शिकत आहे. तिचे पणजोबा कै. अण्णासाहेब तथा ए. तु. माने हे सोलापूर जिल्ह्यातील नामवंत वकील होते. जेथे तिच्या पणजोबांनी वकिली केली ते न्यायालय बघण्यासाठी ती आई-वडिलांबरोबर हट्ट करून भारतात आली. कारण तिलादेखील अमेरिकेत वकील व्हायचे आहे. तिची आई गीतांजली व वडील भारत साळोखे हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. दोघेही न्यूयॉर्कजवळील प्रिंगस्टन शहरात राहतात. अनशा हिचा जन्म अमेरिकेत झाला आहे. भारतीय संस्कृती व आजोळविषयी तिला कमालीचे औत्सुक आहे.
अमेरिकेत वकिलीची परीक्षा फार अवघड आहे. भारतीय वंशाच्या एका महिलेने वकिली करीत न्यायाधीश पदापर्यंत मजल मारली आहे. त्यामुळे लहानपणापासून तिने वकील होण्याचे ध्येय ठेवले असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू केली आहे. तिचे आजोबा ज्येष्ठ विधिज्ञ धनंजय माने, मामा अॅड. जयदीप माने तर तिची आजी रेखा माने या आहेत. आजीचे वडील कै. वसंतराव दळवी हे देखील कोल्हापूर जिल्ह्यातील नामवंत वकील होते. ज्या ठिकाणी आपल्या सर्व पूर्वजांनी वकिली केली ते न्यायालय बघण्याची तिला खूप इच्छा असल्याने शुक्रवारी ती सोलापूर न्यायालयात आली होती.
आजोबांकडून माहिती...
- शुक्रवारी अॅड. धनंजय माने यांचे बार्शी न्यायालयात कामकाज होते. तेथून आल्यावर अनशा हिने जिल्हा न्यायालयात जाण्याचा हट्ट धरला. त्यामुळे अॅड. धनंजय माने यांनी तिला न्यायालयात नेले, न्यायालयाची भव्य इमारत, आतील न्यायकक्ष, सरकारी वकील चेंबर, वकिलांचे चेंबर व परिसर दाखविला. माझ्या आजोबांनी याच न्यायालयात युक्तिवाद केला का असे तिने प्रश्न उपस्थित केले. समोर भेटलेल्या वकिलांनाही तिने संवाद साधला.