विविधतेत एकता; बाप्पा अन् मोहरमचे पंजे एकाच मांडवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 04:43 PM2019-09-09T16:43:37+5:302019-09-09T16:45:40+5:30
नायले हैदरी पंजे आणि नरवीर तरुण मंडळाकडून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन
यशवंत सादूल
सोलापूर : अक्कलकोट रोडवरील गांधीनगर झोपडपट्टी येथील हिंदू-मुस्लीम बांधव यंदा गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र साजरा करीत आहेत़ एकाच मांडवात गणपती बाप्पांची मूर्ती आणि मोहरमच्या पंजाची स्थापना करण्यात आली आहे़ गणपतीची नित्य आरती अन् पंजासमोर उद घालून मंत्रपठण केले जाते़ ‘गणपती बाप्पा मोरया’ सोबत ‘नायले हैदरी की दो चराग ओ दिन’ चा जयघोष केला जातो़
अक्कलकोट रोडवरील गांधी नगर झोपडपट्टी हे सोलापुरातील बहुतांश तेलुगू भाषिकांची कामगार वस्ती म्हणून ओळखली जाते. १९८० च्या दरम्यान ही झोपडपट्टी निर्माण झाली़ या वस्तीत हिंदू, मुस्लीम बंधू एकत्र राहतात. १९८३ साली गणेशोत्सव आणि मोहरम एकत्र आल्याने सर्वत्र तणावाची स्थिती होती.
त्याचवेळी वस्तीतील प्रभाकर तेलंग, शहाबुद्दीन शेख, बाबू कोकणे, अल्लाऊद्दीन शेख, प्रकाश शिंदे या मंडळींनी पुढाकार घेऊन दोन्ही उत्सव एकत्र साजरा करण्याचे ठरविले. पोलिसांची परवानगी घेऊन येथील नरवीर तरुण मंडळाचा बाप्पा आणि वस्तीतील नायले हैदरी पंजे एकाच मांडवात स्थापन करण्यात आले. यामुळे जातीय सलोखा निर्माण होऊन त्याची सर्वत्र चर्चा झाली. आजपर्यंत या वस्तीत एकदाही जातीय सलोखा बिघडला नाही. याचा आदर्श सर्व धर्मातील युवकांनी घेण्यासारखा आहे. मागील चाळीस वर्षांपासून हा जातीय सलोखा राखत साजरा करण्यात येणाºया या उत्सवाची ही चौथी वेळ आहे.
यापूर्वी १९८३,१९९६, २०१८ या वर्षी असा एकत्रितपणे मोहरम आणि गणेशोत्सव या मंडळाकडून साजरा करण्यात आला. मोहरम आणि गणेशोत्सव एकत्र साजरा करण्यासाठी प्रभाकर तेलंग, शहाबुद्दीन शेख, नारायण माशाळकर, अल्लाऊद्दीन शेख, बाबू कोकणे, सतार शेख, भीमा कोरडे, फिरोज शेख, राजू जगताप, शमशुद्दीन शेख, अनिल कलाल, प्रभाकर म्याकल, शकील शेख यांचा सक्रिय सहभाग आहे.
पंजा व विसर्जन मिरवणुकीत हिंदू मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. गणपती विसर्जनानिमित्त प्रसाद व मोहरम विसर्जनानिमित्ताने सरबत वाटप करण्यात येते. मुस्लिम मुले गणपतीची आरती करतात तर हिंदू मुले पंजासमोर उद घालतात, अशी राष्ट्रीय एकात्मता खºया अर्थाने रुजवत, गुण्यागोविंदाने साजरा होणारा उत्सव हे सोलापूरचे वैशिष्ट्य होय.
जोडप्यांसह सत्यनारायण पूजा..
दररोज सकाळी नऊ वाजता आणि रात्री आठ वाजता गणरायाची आरती होते. पंजासमोर उद घालून मंत्रपठणही केले जाते. गणपती बाप्पा मोरया सोबत नायले हैदरी की दो चराग ओ दिन जयघोष केला जातो. यावेळी वस्तीतील हिंदू-मुस्लीम समाजातील अबालवृद्ध मंडळी हजर असतात. मोहरमच्या सातव्या दिवशी निखाºयावर चालून मन्नत मागतात. नवव्या दिवशी गणपतीसमोर मुस्लीम जोडप्यांसह सत्यनारायण पूजा केली जाते.