राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार!

By Appasaheb.patil | Published: January 17, 2023 02:43 PM2023-01-17T14:43:51+5:302023-01-17T14:45:29+5:30

या आंदोलनाची घोषणा विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख व प्रमुख सल्लागार डॉ. आर. बी. सिंह यांनी केली आहे. 

University and college non-teaching staff in the state will boycott the examination from February 2! | राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार!

राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा २ फेब्रुवारीपासून परीक्षा कामकाजावर बहिष्कार!

googlenewsNext

सोलापूर : राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी आपल्या प्रमुख सहा मागण्यासाठी २ फेब्रुवारीपासून सर्व बोर्ड व विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व कॉलेज कर्मचारी युनियन सोलापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष दत्ता भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या आंदोलनाची घोषणा विद्यापीठ व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीचे प्रमुख संघटक अजय देशमुख व प्रमुख सल्लागार डॉ. आर. बी. सिंह यांनी केली आहे. कृती समितीने आंदोलनाचे टप्पे ठरविले असून कर्मचारी त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करतील. राज्य शासनाने याची दखल घेतली नाही तर २० फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. 

कल्याण येथील के. एम. अग्रवाल महाविद्यालयात झालेल्या संयुक्त कृती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गेल्या पाच वर्षापासून विद्यापीठ व महाविद्यालयीन संघटनानी स्वतंत्रपणे आंदोलने केली होती. परंतु आश्वासनाशिवाय विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्यामुळे प्रथमच विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी एकत्र आले आहेत. 

या पत्रकार परिषदेत सचिव रविकांत हुक्केरी, सचिव राजेंद्र गड्ढे , राज्य संघटनेचे उपाध्यक्ष राजेंद्र गोटे, विद्यापीठ सिनेट सदस्य अजितकुमार संगवे, राहुल कराडे, सोमनाथ सोनकांबळे, आनंद व्हटकर, कांचना आगाव, वसंत सकपाळ आदी उपस्थित होते.

या आहेत सहा मागण्या
- सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेले शासन निर्णय पुनर्जिवित करून पूर्ववत लागू करा.
- सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार १० .२०.३० वर्षानंतरच्या लाभावी योजना विद्यापीठीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा.
- सातव्या वेतन आयोगापासून वंचित असलेल्या १४१० विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करुन विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते प्रत्यक्ष सातवा वेतन लागू झाला त्या कालवधीतील वेतनाच्या फरकाची थकबाकी अदा करा. 
- विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली पदे भरण्यास मान्यता द्या. 
- २००५ नंतर सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करा.
- विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचान्यांना सहाव्या वेतन आयोगाची वेतनश्रेणी गृहित धरून त्या आधारे सातवा वेतन आयोगाची वेतनश्रेणी लागू करा.

हे आहेत आंदोलनाचे टप्पे :
 - २ फेब्रुवारी २०२३ पासून होऊ घातलेल्या विद्यापीठ व महाविद्यालयीन स्तरावरील सर्व परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार.
- १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते २.३० अवकाश काळात निदर्शने.
- १५ फेब्रुवारी रोजी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करणे.
- १६ फेब्रुवारी रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप.
- २० फेब्रुवारीपासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्नित महाविद्यालये बेमुदत बंद.
 

Web Title: University and college non-teaching staff in the state will boycott the examination from February 2!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.