बिनविरोध चोपडी ग्रामपंचायतीसमोर पाण्यासाठी महिलांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:12 AM2021-01-08T05:12:48+5:302021-01-08T05:12:48+5:30
सांगोला : बिनविरोध झालेल्या चोपडी ग्रामपंचायतीला अवघ्या चार दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गुरुवारी ...
सांगोला : बिनविरोध झालेल्या चोपडी ग्रामपंचायतीला अवघ्या चार दिवसांत पिण्याच्या पाण्यासाठी महिलांसह ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गुरुवारी संतापलेल्या महिलांसह ग्रामस्थांनी रिकामे हंडे अन् घागरी घेऊन आम्हाला पाणी पाहिजे, बाकी काय कारण सांगू नका असा टाहो फोडत थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या मारत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी ग्रामसेवकांनी समजूत काढून सुरळीत पाणीपुरवठ्याचे आश्वासन देताच हे आंदोलन मागे घेतले.
चोपडी (ता. सांगोला) ग्रामपंचायतीची निवडणूक चार दिवसांपूर्वीच बिनविरोध झाली. एकीकडे ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने सर्वपक्षीय आजी-माजी पदाधिकारी गावपुढारी आनंदात असताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे आठ दिवसांपासून कृत्रिम पाणीटंचाई जाणवत आहे. संतापलेल्या महिलांसह ग्रामस्थांनी गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास हातात रिकामे हंडे अन् घागरी घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालयासमोर ‘आम्हाला पाणी द्या ,बाकी काही सांगू नका’ असा टाहो फोडला.
यावेळी महिलांनी गेल्या वर्षभरात केवळ ८४ दिवस पाणीपुरवठा केल्याचा लेखी पुरावा सादर केला. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बुद्धेहाळ तलावातून लाखो रुपये खर्चून पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली असताना पाणी का सोडले जात नाही असा संतप्त सवाल उपस्थित करून वर्षाकाठी पाणीपट्टीची दोन हजार रुपये आकारणी केली जाते. मग अडचण काय आहे ते तर आम्हाला सांगा म्हणून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीलाच चांगलेच धारेवर धरले.
प्रशासकही फिरकत नसल्याचा आरोप
गावाच्या चहूबाजूंनी मुबलक पाणीसाठा उपलब्ध असूनसुद्धा पिण्याच्या पाण्यासाठी महिला आबालवृद्धांना वणवण भटकंती करावी लागते. त्यामुळे ‘पाणी उशाला आणि कोरड घशाला’ अशी अवस्था गावाकऱ्यांची झाल्याचा संताप आंदोलक महिलांनी व्यक्त केला. ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नेमणूक असून, ते ग्रामपंचायतीकडे फिरकत नसल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ग्रामसेवक एम. व्ही. मिसाळ यांनी गावाकडे तत्काळ धाव घेतली. त्यांनी महिला ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. येत्या चार दिवसांत गावाला सुरळीत पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर तूर्तास ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.
पाणी पुरवठा कर्मचाऱ्यालाही कमी केले
चोपडी गावची लोकसंख्या पाच हजार ५०० आहे. गावाला बुद्धेहाळ तलावातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ एकच कर्मचारी नियुक्त आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यालाही कमी केल्यामुळे गावचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. चोपडी गावची लोकसंख्या पाच हजार ५०० आहे. गावाला बुद्धेहाळ तलावातून पिण्यासाठी पाणीपुरवठा होतो. अशा परिस्थितीत पाणीपुरवठा करण्यासाठी केवळ एकच कर्मचारी नियुक्त आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यालाही कमी केल्यामुळे गावचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
फोटो - ०७ चोपडी
चोपडी ग्रामपंचायत कार्यालयासमोर महिलांनी पिण्याच्या पाण्यासाठी रिकामे हंडे अन् घागरी घेऊन ठिय्या मारला.