गारपिटीचा १०४ गावांना फटका; ३४७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका
By विठ्ठल खेळगी | Published: March 19, 2023 05:51 PM2023-03-19T17:51:17+5:302023-03-19T17:52:16+5:30
अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे.
सोलापूर : अवकाळीने जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, ज्वारी, गहू, केळी, कांदा पपई, कलिंगड, आंबा, पेरू व ज्वारीच्या ३४७० हेक्टरचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयार केला आहे.
सोलापूर जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे उत्तर तालुक्यातील ११ तसेच माळशिरस व बार्शी तालुक्यातील २.८० असे १३.८० हेक्टरचे नुकसान झाले होते. शनिवारी दुपारपासून जिल्हाच्या विविध वादळ, वारे, गारपीटसह पाऊस पडला. यामुळे माढा, उत्तर सोलापूर व सांगोला तालुके वगळता आठ तालुक्यातील पीकांना झळ पोहोचली. आंबे गळून पडले तर द्राक्षाच्या घडात पाणी शिरल्याने नुकसान पोहोचले. गहू, ज्वारी भिजून गेली व कडबा काळा पडला. पपई, चिक्कू, पेरुचे नुकसान झाले. कांद्याचा रेंदा झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.
सर्वाधिक झळ अक्कलकोटला
शनिवारी झालेल्या गारपीट, वादळ व पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ३८ गावच्या ८१९ शेतकऱ्यांच्या ३२२ हेक्टर क्षेत्रातील पीकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट पाठोपाठ माळशिरस तालुक्यातील २८ गावच्या ७३० शेतकऱ्यांच्या ६२५ हेक्टरमधील पीकांची हानी झाली आहे. करमाळा तालुक्यातील १२ गावच्या ३०९ शेतकऱ्यांच्या २१६ हेक्टर पीकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील ९ गावच्या ७६ शेतकऱ्यांचे ५८ हेक्टर पीकहानी झाल्याचे सांगण्यात आले. पंढरपूरच्या ६ गावांना गारपीटीचा तडाखा बसला आहे. ६ गावांतील २४०० शेतकऱ्यांच्या १८५० हेक्टरमधील पीकांना नुकसान पोहोचले आहे. बार्शी तालुक्यातील ४ गावच्या २३६ हेक्टरमधील १८० हेक्टर, दक्षिण तालुक्यातील ४ गावांतील १३२ शेतकऱ्यांच्या ८३ हेक्टरचे तर मंगळवेढा तालुक्यातील ३ गावांतील ६७ शेतकऱ्यांच्या १३६ हेक्टर क्षेत्रात नुकसान पोहोचले आहे.
अवकाळी पाऊस व गारा पडल्याने रब्बी हंगामातील व इतर पीकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार गुरुवार, शुक्रवार व शनिवारी पडलेला पाऊस हानीकारक ठरला आहे. ज्यांनी रब्बी हंगामातील पीकांचा विमा भरला आहे त्यांनी विमा कंपनीकडे पीक नुकसानीबाबत तक्रार ( इंटीमेशन) नोंदवावी. - बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी