मक्यावर अमेरिकन लष्करी अळींचा हल्ला, ऐन दुष्काळात जनावरांच्या चाºयासाठी हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 01:07 PM2019-03-16T13:07:22+5:302019-03-16T13:08:39+5:30
मोहोळ : तीन वर्षे सातत्याने कमी पाऊस पडल्याने दुष्काळाच्या छायेत असणाºया मोहोळ तालुक्यात चालू वर्षी तर पाऊसच पडला नाही. ...
मोहोळ : तीन वर्षे सातत्याने कमी पाऊस पडल्याने दुष्काळाच्या छायेत असणाºया मोहोळ तालुक्यात चालू वर्षी तर पाऊसच पडला नाही. अशा कठीण परिस्थितीत किमान पशुधन तरी जतन करावे म्हणून शेतकºयांनी खरीप व रब्बी हंगामात मक्याची पेरणी केली. परंतु त्या मक्याच्या पिकावर अमेरिकेत आढळणाºया स्पोडोप्टेरा फु्रगीपपर्डा या अमेरिकन लष्करी अळीने मोहोळ तालुक्यात शिरकाव केला असून, उत्पन्नासह जनावरांच्या वैरणीसाठी केलेले मका पीक पूर्णपणे धोक्यात आले असून, आता ऐन उन्हाळ्यात जनावरांना वैरणीसाठी काय टाकावे, याची चिंता बळीराजाला सतावत आहे.
तीन वर्षे मोहोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुका दुष्काळाच्या छायेत वावरत आहे. अशा परिस्थितीत चालू वर्षी तर पाऊसच पडला नाही. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामासह ऊस पीक धोक्यात आले आहे. ऐन उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्यासह चाºयाची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. अशा परिस्थितीत चारा टंचाईवर मात करण्यासाठी रब्बी हंगामात मोहोळ तालुक्यात उत्पादनासाठी म्हणून १,७२१ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी करण्यात आली होती. १,९५५ हेक्टर क्षेत्रावर चाºयासाठी मक्याची पेरणी करण्यात आली होती. असे एकूण ३,४६३ हेक्टर क्षेत्रावर मक्याचे पीक लावले होते तर खरीप हंगामात उत्पादन घेण्यासाठी म्हणून १,५८० हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी करण्यात आली होती. १,८६३ हेक्टर चाºयासाठी म्हणून असे एकूण ३,४६३ हेक्टर क्षेत्रावर तर रब्बी व खरीप धरुन ७,१४२ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी करण्यात आली आहे.
हे मक्याचे पीक वाढीस लागले असतानाच गेली दीड महिन्यापासून मोहोळ तालुक्यात अमेरिकेत मका पिकावर आढळणाºया अमेरिकन लष्करी अळीने शिरकाव केल्याने हे मका पीक धोक्यात आले आहे. मका पिकाच्या ताटातच या अळीचे वास्तव्य आढळत असल्याने मक्याची वाढच होत नाही. महागात महागडे असणारे कोराजन हे औषध फवारणी करूनही कीड आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांनी मका पीक काढून टाकले आहे. अनेक ठिकाणी लावलेल्या मकेवर शेतकरी फवारणी करून बेजार झाले आहेत. यामुळे भविष्यात उद्भवणाºया चारा टंचाईला तोंड देत पशुधन कसे जतन करावे, असा मोठा प्रश्न बळीराजा समोर उभारला आहे.
फवारणीचाही उपयोग नाही
- - आठ एकर क्षेत्रावर ऐंशी हजार रुपये खर्च करुन मक्याचे पीक लावले होते. परंतु एक महिन्यात अमेरिकन लष्करी अळीने या पिकावर अटॅक केल्याने पूर्णपणे पीक धोक्यात आले आहे.
- - महागात महाग असणाºया औषधाच्या फवारण्या करूनही या अळीला आळा बसला नाही. आता जनावरांना वैरण कुठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाल्याचे नामदेव काळे या शेतकºयाने सांगितले.
मका पीक काढून टाकले
- - आठ हजार रुपये खर्च करून एक एकर क्षेत्रात मक्याची पेरणी केली होती. परंतु अमेरिकन लष्कर अळीने शिरकाव केल्याने मका काढून टाकल्याचे आढेगावचे शेतकरी राजू वाघमारे यांनी सांगितले. मोहोळ येथील सीताराम गुरव यांनी १० हजार रुपये खर्चून केलेल्या दीड एकर मकेत या अळीने पीक धोक्यात आले आहे.
काय आहे लष्करी अळी
- - स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ही कीड प्रामुख्याने अमेरिकन फॉल आर्मी वर्म या नावाने ओळखली जाते. या किडीसाठी मका हे मुख्य यजमान पीक आहे. तसेच भुईमूग, ऊस, ज्वारी, कापूस, भात यासह ८० पिकांवर ही कीड उपजीविका करू शकते. या किडीच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे. आफ्रिकेतील नायजेरिया देशामध्ये २०१६ मध्ये प्रथम आढळलेल्या या किडीने आफ्रिकेतील ४४ देशांमध्ये शिरकाव केला आहे. या किडीने आता राज्यासह जिल्ह्यात व मोहोळ तालुक्यात शिरकाव केल्याने शेतकरी धास्तावला आहे.