मंगळवेढ्यात मोकाट फिरणार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:13 PM2021-05-01T16:13:21+5:302021-05-01T16:13:49+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग
मंगळवेढा : मंगळवेढा शहरातील चोखामेळा चौकातील मेडिकल दुकाना समोरील गर्दी वाढत्या कोरोनाला आमंत्रण देत असल्याने सोलापूरचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक यांनी भेटीप्रसंगी प्रत्यक्ष पाहिल्याने सर्व मेडिकलवाल्यांना एकत्र बोलावून कोरोना नियमांचे पालन करा अन्यथा वेळ पडल्यास मेडिकल सील करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, मंगळवेढयातील वाढता कोरोनाचा आकडा व मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरा द्वारे रस्त्यावर मोकाट फिरणार्यावर कॅमेरातून नजर ठेवून कारवाई केली जाणार आहे.
सोलापूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी मंगळवेढयास शुक्रवारी धावती भेट दिली. या दरम्यान शहरात प्रथम आल्यानंतर चोखामेळा चौकात मेडिकलच्या समोर मोठया प्रमाणात गर्दीचे चित्र दिसल्याने सर्व मेडिकलवाल्यांना एकत्र बोलावून कोरोनाचे नियम पाळा, टेस्टिंग करा, ग्राहकांमध्ये अंतर ठेवा अशा सक्त सुचना करून नियम न पाळल्यास मेडिकल नाईलाजाने सील करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. ग्रामीण भागात शेती उद्योगामुळे मजूर, शेतकरी बाहेर पडतात. परिणामी कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शहरात रूग्णांची संख्या कमी असून ग्रामीण क्षेत्रामध्ये जास्त असल्याचे ते म्हणाले. मंगळवेढा शहरात मोकाट फिरणार्यांची संख्या जादा असल्याने कारवाईसाठी जादा फोर्स देण्यात आला असून अजून नव्याने पाच चारचाकी वाहने देण्याचे नियोजन आहे. मेडिकलवाल्यांची जाग्यावर रॅपीड टेस्ट करण्याच्या सुचना नगरपालिकेस केल्या. अतिरिक्त पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी डीवायएसपी कार्यालयात सांगोला व मंगळवेढा पोलिस अधिकार्यांची कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बैठक घेवून मार्गदर्शनपर सुचना केल्या.
मंगळवेढा तालुक्यात वाढता कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करूनही काही मोकाट लोक विनाकामाचे रस्त्यावर फिरत असल्यामुळे कोरोनाची साखळी कशी तुटणार? याबाबत पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलत कारवाईसाठी मंगळवेढयात ड्रोन कॅमेराचा वापर करण्याचा इशारा दिला आहे. या ड्रोन कॅमेरामधून कोणाचीही सुटका होणार नाही. रस्त्यावर मोकाट फिरणार्याला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कृषि उत्पन्न बाजार समितीसमोर भाजीपाला विक्रेते गर्दी करीत असल्याने तसेच हॉटेल व ढाबे पार्सल देण्याऐवजी उद्यडे ठेवत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा यावेळी पोलिस प्रशासनाने दिला.
यावेळी डीवायएसपी राजश्री पाटील, पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे, सांगोल्याचे पोलिस निरीक्षक आदि उपस्थित होेते.