गुन्हेगारी नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर : अंकुश शिंदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 02:21 PM2019-07-03T14:21:13+5:302019-07-03T14:26:43+5:30
हैद्राबाद व लंडनमध्ये खूप शिकायला मिळाल्याची भावना सोलापूर शहर पोलीस आयुक्तांनी केली व्यक्त
सोलापूर : लंडन येथील आठ दिवसांच्या ट्रेनिंगदरम्यान खूप काही शिकायला मिळाले, तेथील पोलिसिंग जवळून पाहावयास मिळाली. प्रशिक्षणात जाणून घेतलेल्या काही गोष्टी सोलापुरात केल्या जातील. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा होईल याचा प्रयत्न राहील, असे मत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.
सोलापूर शहर पोलीस आयुक्ताचा पदभार घेतल्यानंतर काही दिवसांतच अंकुश शिंदे हे गृहमंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणासाठी गेले होते. महिनाभर चाललेल्या प्रशिक्षणात ते १५ दिवस हैदराबाद येथे होते. आठ दिवस लंडन येथे गेले होते. लंडनमध्ये तेथील गुन्हेगारीचे स्वरूप, पोलिसिंग पद्धत, तपास यंत्रणा आदी विविध गोष्टींचा जवळून अभ्यास केला. लंडन येथील ट्रेनिंगचा फायदा सोलापूरच्या पोलिसिंगसाठी कसा करता येईल, याचा विचार करीत आहे. शहरातील घरफोड्या, चोºया, चेन स्नॅचिंग आणि मारामारीसारखे गुन्हे रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल, याची माहिती घेत आहे.
शहरातील मुख्य चौक, प्रमुख रस्ते, गजबजलेल्या बाजारपेठा आदी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे कसे बसविता येतील, अस्तित्वात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची स्थिती काय आहे, हे पाहून शहरातील दिवसभराच्या हालचाली आयुक्तालयात बसून पाहता येतील, अशी व्यवस्था करणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक ठिकाणी कॅमेरे बसविण्याचे नियोजन करता येते का, याची माहिती घेऊ. शहराच्या पोलिसिंगमध्ये आधुनिकता आणण्याचे प्रयत्न करू, असेही ते म्हणाले.
रात्रगस्त वाढविणार
- शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्रीची गस्त वाढविली जाईल. रात्री-अपरात्री सार्वजनिक रस्त्याच्या कडेला, चौकात बसून गप्पा मारणारे व हुल्लडबाजी करणाºयांवर कारवाई केली जाईल. रात्री फटाके फोडणे, रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे आदींसारख्या बेशिस्त वर्तनावर पोलिसांचे लक्ष राहील. नियम सर्वांसाठी सारखे आहेत, नागरिकांनी त्याचे पालन करावे. स्वत:ला एक शिस्त घालून घ्यावी. गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही, सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही. पोलीस जनतेच्या संरक्षणासाठी आहेत, ते आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडतील. जनतेमधूनही तितकाच प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे, असेही यावेळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले.