बंदी असताना प्लास्टिकचा वापर; सोलापुरातील चार व्यावसायिकांवर महापालिकेची कारवाई
By Appasaheb.patil | Published: April 21, 2023 05:02 PM2023-04-21T17:02:20+5:302023-04-21T17:02:54+5:30
सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध १६७ आस्थापनांची तपासणी करून चार व्यवसायधारकांवर ...
सोलापूर : प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील विविध १६७ आस्थापनांची तपासणी करून चार व्यवसायधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून एकूण ५८ किलो प्लास्टिक गुरुवारी जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली.
महापालिका आयुक्त शितल तेली - उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक बंदी मोहिमेअंतर्गत मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षकांनी सोलापूर शहरात विविध १६७ दुकानांची तपासणी केली. शहरातील काळी मशीद परिसर, सुपर मार्केट, एसटी स्टँड, सिद्धेश्वर मार्केट यार्ड, कोंत्तम चौक, ७० फूट रोड परिसर, आसरा चौक, सैफुल, मरीआई चौक, विजापूर रोड, मधला मारुती, फुलारी गल्ली, अशोक चौक आदी परिसरातील दुकानांची , व्यवसायधारकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये सिद्धेश्वर मार्केट यार्ड, कोंत्तम चौक, मधला मारुती फुलारी गल्ली, अशोक चौक परिसरातील चार व्यवसाय धारकांवर प्रत्येकी पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई करून एकूण २० हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे तर एकूण 58 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. या मोहिमेत आरोग्य निरीक्षक सूर्यकांत लोखंडे, नडीमेटला, केदारनाथ गोटे, तमशेट्टी, इंगळे, नागटिळक, अन्वर शेख, नल्लामंदू आदींनी ही कारवाई केली.