पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या नावाचा वापर; बनावट चारीत्र्य प्रमाणपत्र बनविणाऱ्यास अटक
By संताजी शिंदे | Published: September 22, 2023 01:15 PM2023-09-22T13:15:31+5:302023-09-22T13:15:38+5:30
पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, फौजदार शैलेश खेडकर व त्यांचे पथक पाकणी येथे दाखल झाले.
सोलापूर : पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या नावाचा वापर करून, बनावट 'चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र' तयार करणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.
विशाल भारत येलगुंडे, (वय-३३ रा. पाकणी, ता. उत्तर सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाकणी येथे एक इसम ग्रामीण भागातील नागरिकांना बनावट चारीत्र्य पडताळणी प्रमाणपत्र देत असल्याची माहिती, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी इसमाचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर, सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी जायपत्रे, फौजदार शैलेश खेडकर व त्यांचे पथक पाकणी येथे दाखल झाले.
विशाल येलगुंडे याच्याकडे चौकशी केली असता, तो पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून देण्यात आलेल्या चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रामध्ये फेरफार करून डिजिटल सिग्नेचरचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रक़रणी पोलिस हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत बाबुराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्रे तयार करणे, ते बाळगणे आणि बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरणे हा गंभीर दखलपात्र अपराध आहे. बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यांबाबत माहिती असल्यास पोलिस अधीक्षक कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन पोलिस अधिक्षकांनी केले आहे.