उजनी पाणीसाठ्यात एक टक्क्याने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 07:47 PM2019-07-03T19:47:34+5:302019-07-03T19:49:24+5:30
पुणे जिल्ह्यात पाऊस सुरू; दौंडमधून ४६०० क्युसेकचा विसर्ग सुरू
भीमानगर: पुणे जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे दौंडमधून उजनी धरणात सोमवारपासून विसर्ग चालूच आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता दौंडमधून ४३४७ क्युसेकने विसर्ग सुरू होता तर दुपारी १२ वाजता ४४०० क्युसेक विसर्ग सुरु होता. सायंकाळी ६ वाजतादेखील ४६०० क्युसेक इतका विसर्ग सुरू होता.
मंगळवारी दिवसभर पुणे जिल्ह्यातील मावळ भागात व भीमाशंकर परिसरात पाऊस सुरूच होता. त्यामुळे पाणी विसर्ग सुरूच राहणार आहे. सोमवारी उजनी धरण वजा ५९.०५ टक्के होते. मंगळवारी वजा ५८.९४ टक्क्यांवर आले. एकूण पाणीपातळी ४८५.०९० मीटर आहे.तर एकूण पाणीसाठा ९०८.६० दलघमी आहे.
उपयुक्त पाणीसाठा वजा ८९४.२१ दलघमी आहे. टक्केवारी ५८.०६ इतकी असून, एकूण पाणीसाठा ३२.०८ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा वजा ३१.५८ टीएमसी आहे. गेल्यावर्षी आजच्या दिवशी एकूण पाणीपातळी वजा १९.४९ टक्के होती. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पाणी वाढ होत असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.