पदे रिक्त असल्याने साडेतीन लाख पशुधनाचे आरोग्य धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:22 AM2021-03-17T04:22:47+5:302021-03-17T04:22:47+5:30
२०१२ च्या पशुगणनेप्रमाणे सांगोला तालुक्यात १ लाख ७३ हजार ४८२ लहान-मोठी जनावरे, १ लाख ९० हजार ८७४ शेळ्या-मेंढ्या अशी ...
२०१२ च्या पशुगणनेप्रमाणे सांगोला तालुक्यात १ लाख ७३ हजार ४८२ लहान-मोठी जनावरे, १ लाख ९० हजार ८७४ शेळ्या-मेंढ्या अशी ३ लाख ६४ हजार ३५६ लहान-मोठी जनावरे आहेत. तालुक्यात पशुसंवर्धन खात्यामार्फत वैद्यकीय उपचार, गावठी वळूंचे खच्चीकरण, साथीच्या रोगाचा प्रसार होवू नये यासाठी रोग प्रतिबंधक लसीकरण, साथीच्या रोगाचा प्रसार झाल्यास त्यावर उपचार, संकरीत गौ-पैदास वाढविण्यासाठी कृत्रिम रेतन कार्यक्रम, कुक्कूटपालन, शेळी पालन व दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी प्रशिक्षण, शेळ्यांचे गट वाटप, दुधाळ जनावरांचे वाटप, संकरीत वासरांचे मेळावे, कार्य मोहिमा, प्रशिक्षण शिबिर, सुधारित चाऱ्यांची पिके घेण्यासाठी वैरण बियाणे व रोपे वाटप, पशुसंवर्धन विषयक कायद्याची अंमलबजावणी आदी कामे केली जातात.
पंचायत समितीअंतर्गत पशुसंवर्धन विभागात श्रेणी १ चे १५ व श्रेणी २ चे ९ दवाखाने आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांची ३, सहाय्यक पशुधन विकास अधिकाऱ्यांची ३, पशुधन पर्यवेक्षकाचे १, व्रणोपचारची ४, परिचरची १२ अशी २३ पदे रिक्त असल्याने पशूंचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पशुपालक अडचणीत
सांगोला तालुक्यातील अर्थव्यवस्था शेती व पशुपालन व्यवसायावर अवलंबून आहे. या तालुक्यात पशुधनाची संख्या मोठी असूनही गेल्या अनेक वर्षापासून पशुवैद्यकीय दवाखान्यातील रिक्त पदे भरण्यास दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. परिणामी पशुपालक शेतकऱ्यांना आजारी जनावरांवर लागलीच औषधोपचार करण्यासाठी विविध प्रकारचा त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे पशुपालक शेतकरी अडचणीत सापडला आहे.