सोलापूर जिल्ह्यात रविवारी लसीकरण मोहिम; ४ लाख ५० हजार बालकांना देणार पोलिओ डोस
By Appasaheb.patil | Published: March 2, 2024 04:57 PM2024-03-02T16:57:01+5:302024-03-02T16:58:05+5:30
सोलापूर जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ४५ हजार ३४३ बालके असून एकही पाच वर्षाखालील बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
सोलापूर : भारत हा पोलिओ मुक्त देश आहे. मात्र काही देशामध्ये पोलिओ अजूनही आहे.त्यामुळे खबरदारी म्हणून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेंतर्गत ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस देण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जागृत राहून रविवारी ३ मार्च २०२४ रोजी आपल्या बालकांना पोलिओचा डोस आवश्य द्यावा असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात ० ते ५ वयोगटातील ४५ हजार ३४३ बालके असून एकही पाच वर्षाखालील बालक पोलिओ लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. यासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करण्यात आली आहे. पल्स पोलिओ डोस पासून एकही बालक वंचित राहू नये याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यामध्ये ३१२४ लसीकरण केंद्र स्थापन केली असून ५ वर्षे वयोगटापर्यंतील ४५०३४३ बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. पोलिओ लसीकरण करण्यासाठी प्रत्येक गाव पाड्यावर पोहचून लस पाजण्यासाठी १९६ ट्रान्झीट टीम व मोबाईल टीम १३९ कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.७७ आरोग्य वर्धिनी केंद्र व ४२७ उपकेंद्र तसेच ७५११ आरोग्य कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी ६०१ पर्यवेक्षक याचे माध्यमातून मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
पल्स पोलिओ लसीकरण दिनाच्या दिनाच्या दिवशी डोस देण्यात आला नसेल तर वंचित राहिलेल्या बालकांना गृहभेटी दरम्यान पोलिओ डोस देण्याचा कार्यक्रम ग्रामीण भागात ५ ते ७ मार्च २०२४ (३ दिवस ) शहरी भागात ५ ते ९ मार्च २०२४ (५ दिवस) पर्यंत देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले व जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध पिंपळे यानी सांगितले.