प्रतिक्षा वाढली; लसीकरण चाललेय कासवगतीने, सर्वांना लस मिळण्यास लागेल वर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 07:24 PM2021-07-29T19:24:17+5:302021-07-29T19:24:23+5:30
: चार दिवसाआढ मिळतात १० ते १५ हजार डोस
सोलापूर : लसीचा पुरवठा चार दिवसाआड होत असल्याने जिल्ह्यातील ३५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी एक वर्ष लागणार असे चित्र आहे. पहिला डोस घेतलेल्यांना वेळेत दुसरा डोस मिळणेही मुश्कील होत असल्याबद्दल लोकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
१६ जानेवारीपासून लसीकरणाला प्रारंभ झाला. पहिल्यांदा आरोग्य व नंतर फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. त्यानंतर १ मार्चपासून ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेले व ६० वर्षांवरील लोकांना लसीकरण सुरू करण्यात आले. १ एप्रिलपासून ४५ वर्षांपुढील सर्वांना व १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण सुरू करण्यात आले. आरोग्य व फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना शंभर टक्के पहिला डोस देण्यात आला, पण दुसरा डोस ८० टक्के कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. लसीचा पुरवठा कमी व दोन डोसमधील अंतर वाढविल्याने ही स्थिती निर्माण झाली. अशात १८ वर्षांवरील लोकांना लसीकरणाचा निर्णय घेतल्यावर जिल्ह्यातील लाभार्थी वाढले, पण त्यामानाने डोस पुरवठा होत नाही असे चित्र आहे.
आतापर्यंत झालेले लसीकरण
४८ केंद्रात सुरू आहे लसीकरण
जिल्ह्यात ४८ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. यामध्ये ४५ शासकीय व ३ खासगी केंद्राचा समावेश आहे. सोलापूर शहरासाठी महापालिकेने ३८ नागरी आरोग्य केंद्रावर लसीकरणाची सोय केली आहे. असे असले तरी ग्रामीण भागात ज्येष्ठ नागरिक व तरुण अद्याप मोठ्या प्रमाणावर लसीकरणापासून वंचित आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस दिली जाते. त्यामुळे बाजूच्या गावातील लोकांना लस आल्याचे माहीत होत नाही. शहरात ऑनलाइन नोंदणी केल्याशिवाय लस दिली जात नाही. विडी कामगारांनी आंदोलन केल्यावर त्यांच्यासाठी पाच केंद्रांवर ऑनस्पॉट लसीकरणाची सोय करण्यात आली. पण लस चार दिवसाआड मिळत असल्याने वेटिंग वाढले आहे.
लसीकरण का वाढेना
शासनाकडून लसीचा कमी प्रमाणात पुरवठा होत आहे. दुसऱ्या लाटेनंतर नागरिकांचा लसीकरणाला प्रतिसाद वाढला आहे. पण त्यामानाने लस उपलब्ध होत नाही. चार दिवसांनंतर लस पुरवठा होतो. १० ते १५ हजार डोस उपलब्ध केल्याने लसीकरण केंद्रावर पहाटेपासून रांगा लागत असल्याचे चित्र आहे. डोस उपलब्ध झाले की त्याच दिवशी लस संपते, अनेकांचा हेलपाटा होतो. उर्वरित २७ लाख जणांना डोस देण्यास वर्ष लागेल अशी स्थिती आहे.
अद्याप डोस मिळेना...
लस घेण्यासाठी मी तीन वेळा लसीकरण केंद्रावर गेलो. पण माझा नंबर येण्याआधीच लस संपली. ऑनलाइन बुकिंग करून येण्यास सांगितले जाते. पण लस कधी येते ही माहीत नसल्याने ऑनलाइन नोंदणी करताना स्लॉट फुल्ल असल्याचे वेबसाइटवर दिसते. तर मग आम्हाला लस कधी मिळेल.
- प्रमोद माढे, लाभार्थी
लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेल्यावर रांगा दिसून येतात. कोरोना प्रतिबंधासाठी गर्दी करू नका, फिजिकल डिस्टन्स हवे असे सांगितले जाते. पण लसीकरण केंद्रावरच हा नियम पाळला जात नसल्याचे दिसून येते. गर्दीत लस घेण्यास जाणे भीतीचे वाटते. गर्दी कमी झाल्यावर लस घेण्याचे पाहू.
- प्रियंका जानराव, लाभार्थी