शहरातील जनावरांचे लसीकरण पूर्ण, दोन आठवड्यात लम्पी येईल नियंत्रणात
By शीतलकुमार कांबळे | Published: September 17, 2023 02:18 PM2023-09-17T14:18:23+5:302023-09-17T14:18:52+5:30
२० बाधित ८ जनावरांचा मृत्यू, पशुसंवर्धन विभागाची माहिती
शीतलकुमार कांबळे, सोलापूर : शहरातील गायवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या दोन आठवड्यात लम्पी पूर्ण नियंत्रणात येईल, अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. भास्कर पराडे यांनी दिली.
सध्या शहरामध्ये लम्पी बाधित २० जनावरे असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. शहरातील १९०० गायवर्गीय जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. या आठवड्यात एकाही जनावराचा मृत्यू झाला नाही. उपचार वेळेवर होत असल्याने जनावरे तीन ते चार दिवसात बरे होत आहेत. शहरात भटकी जनावरे अधिक आहेत. त्यांचा मालक नसल्यामुळे अशा जनावरांवर उपचार करणे मुश्किल बनते.
जिल्ह्यासह शहरात लम्पी बाधित जनावरे आहेत. यावर्षी एप्रिल महिन्यापासून आत्तापर्यंत एकूण आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात गायवर्गीय जनावरांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. २१ दिवसात या जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती येते. लसीकरण पूर्ण होऊन ६ दिवस पूर्ण झाले आहेत. येत्या १५ दिवसात लम्पी नियंत्रणात येईल, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.