३० हजार लोकसंख्येच्या टेंभुर्णीत केवळ साडेतीन हजार लोकांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:20 AM2021-05-15T04:20:45+5:302021-05-15T04:20:45+5:30
एप्रिल महिन्यापासून शहरात माढा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. कडक निर्बंध व संपूर्ण ...
एप्रिल महिन्यापासून शहरात माढा तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनामुळे अनेकांनी जीव गमावला आहे. कडक निर्बंध व संपूर्ण लॉकडाऊन हे सर्व चालू आहे तरी शहर व परिसरातील लोक काही घरांत थांबायचे नाव घेत नाहीत. त्यामुळे बाधितांची आकडा वाढत आहे. एप्रिल महिन्यात रोज सरासरी २५ बाधित रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या कमी करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने मे महिन्यात सात दिवसांचा लाॅकडाऊन लावला होता. शासन व स्थानिक प्रशासनाकडून वेळोवेळी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत असले तरी तरुण मुले विनाकारण दुचाकीवरून फिरताना दिसतात.
होमआयसोलेशनवर भर
टेंभुर्णीत एप्रिल महिन्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा ५०० च्या पुढे गेला होता. तो मेमध्ये आणखी वाढला. रुग्णसंख्या वाढत असताना शहरात कोविड केअर सेंटरची क्षमता फक्त १६० तेवढीच असल्याने अनेक रुग्णांना होम आयसोलेशन केले जात आहे. या ठिकाणी अनेकांची घरे लहान असल्याने होम आयसोलेशनमध्ये अडचणी निर्माण होत आहेत. होम आयसोलेशनमधील अनेक रुग्ण बेफिकीर वृत्तीने घराबाहेर पडताना दिसतात. ते नियम पाळत नसल्याने संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत असल्याचे बोलले जात आहे.
लसीकरणात सुसूत्रता
असली लसीचा तुटवडा आहे. १८ ते ४४ वयोगटांचे लसीकरण सध्या बंद आहे. दुसरा डोस असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात येत आहे. यासाठी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. नंदकुमार घोळवे, डॉ. अमोल माने व डाॅ. विक्रांत रेळेकर व त्यांचे सर्व सहकारी परिश्रम घेत आहेत.
कोट ::::::::::::
टेंभुर्णीसाठी उपलब्ध असलेल्या लसींपैकी १० टक्के लस शासकीय कर्मचाऱ्यांना तर उर्वरित दुसरी लस घेणाऱ्यांना दिली जात आहे. विशेषत: ६० वर्षावरील नागरिकांना प्राधान्याने देण्यात येत आहे. मागील दोन दिवसांत पाचशे लोकांची नोंदणी झाली असून त्यांना टोकन दिले आहे.
- प्रमोद कुटे,
सरपंच