अठरा वर्षावरील तरुणांना मिळेल विकत लस; ४५ वर्षावरील लोकांचे मात्र मोफत लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 12:50 PM2021-04-27T12:50:04+5:302021-04-27T12:50:48+5:30
प्रशासन लागले तयारीला: २४ लाख नवे लाभार्थी, ग्रामीणमध्ये २६८ केंद्रे; तीन महिन्यांत लसी देण्याचे उद्दिष्ट
सोलापूर: जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे लसीकरणाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. १ मेपासून १८ वर्षाच्यापुढील तरुणांना लस देण्याची केंद्रशासनाने घोषणा केली असली तरी ही लस फक्त खासगी दवाखान्यातूनच; पण विकत मिळणार असल्याचे आरोग्य विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अद्याप यावर राज्य शासनाने निर्णय घेतलेला नाही. १८ वर्षावरील तरुणांना लस देण्याचे नियोजन केल्यामुळे ग्रामीण भागात २४ लाख ७ हजार ८९८ लाभार्थी वाढणार आहेत. तीन महिन्यात लसीकरण पूर्ण करावयाचे आहे.
आत्तापर्यंतच्या लसीकरणासाठी ग्रामीण भागात १२८ केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत यासाठी १ हजार ३३८ कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. २५ एप्रिल अखेर यातील दोन लाख ५४ हजार ३०३ व्यक्तींना पहिला डोस तर ४० हजार ५०२ व्यक्तींना दुसरा डोस देण्यात आला आहे आतापर्यंत जिल्ह्यात केवळ उद्दिष्टाच्या ३२.६ टक्के इतके लसीकरण झाले आहे.
शासनाने १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात केली पहिल्या टप्प्यात आरोग्य व फ्रंटलाइन कर्मचारी होते त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षावरील व्यक्तींचा समावेश करण्यात आला. यामुळे लाभार्थींची संख्या १४ लाख ६४ हजार ५४२ वर पोहोचली आहे. आता अठरा वर्षांपुढील तरुणांना लस देण्याचे घोषित केल्यामुळे लाभार्थींची संख्या २४ लाखांवर गेले आहे. लाभार्थी दुप्पट वाढल्याने तीन महिन्यात हे लसीकरण उरकण्यासाठी २६८ केंद्र सुरू करण्यात येणार आहेत असे लसीकरण समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी सांगितले.
संभ्रम कायम
केंद्र शासनाने १८ वर्षावरील तरुणांना लस देण्याला परवानगी दिली आहे; पण केंद्र शासनाच्या अटीमध्ये तरुणांना ही लस विकतच घ्यावी लागणार आहे; पण नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा भार आम्ही उचलू, अशी तयारी दर्शवली आहे; पण अद्याप याबाबत स्पष्ट संकेत न आल्याने आरोग्य विभागाने तरुणांना खासगी केंद्रावर लसीकरण करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे राज्य शासनाचा निर्णय न आल्यास तरुणांना ही लस विकत घ्यावी लागणार आहे.
दुसऱ्या डोससाठी स्वतंत्र कक्ष
१ मेपासून तरुणांना लसीकरणास मुभा असल्यामुळे लसीकरण केंद्रावर गर्दी होणार हे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे दुसरा डोस घेण्यास येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लसीकरण केंद्रावर स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार आहे.
ग्रामीणच्या केंद्रावर गर्दी
महापालिका हद्दीतील सात नागरी केंद्रावर लसीकरण सुरू आहे; पण या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे त्यामुळे शहरातील अनेक लोक बाहेरच्या ग्रामीण आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी जात असल्याचे दिसून आले आहे कोंडी कुंभारी होटगी व मंद्रूप केंद्रावर शहरातील लोक येत आहेत.
विडी कामगारांची गैरसोय
कुंभारी परिसरातील गोदुताई विडी घरकूल व इतर ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे महानगरपालिकेचे केंद्र त्यांच्यापासून दूर असल्याने येथील नागरिक कुंभारी येथील केंद्रावर जात आहेत पण लसीचा साठा संपत असल्यामुळे या कामगारांची बऱ्याच वेळा गैरसोय होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.