वैकुंठ एकादशी ; सोलापुरातील बालाजी मंदिरात ७० हजार भाविकांच्या दर्शनाची सोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 02:44 PM2018-12-18T14:44:06+5:302018-12-18T14:48:20+5:30
आज पहाटेपासून सुरू झाल्या धार्मिक विधी ; रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार
सोलापूर : दाजीपेठेतील व्यंकटेश्वर मंदिरात वैकुंठ एकादशीनिमित्त दर्शनासाठी घेण्यासाठी येणाºया भाविकांची मंदिर समितीतर्फे चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. पहाटे सहा वाजल्यापासून दर्शनाची सुरुवात होणार असून, रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर भक्तांसाठी खुले राहणार आहे.
आषाढ महिन्यात निद्राधीन भगवंताची निद्रा धनुर्मासात संपते. हा दिवस म्हणजे वैकुंठ एकादशीचा दिवस मानला जातो. या दिवशी विष्णूच्या दर्शनासाठी अवघे वैकुंठ अवतरते, असे मानले जाते. हा सोहळा पूर्व भागातील व्यंकटेश्वर मंदिरात भक्तिभावाने साजरा होतो. या दिवशी बालाजीचे दर्शन घेण्यासाठी शहर आणि जिल्ह्यात हजारो भाविक येत असतात. या भाविकांच्या दर्शनासाठी मंदिर समितीने मंदिराच्या भोवती गोल दर्शनरांग केली आहे. या रांगेतून साधारण ६० ते ७० हजार भाविक दरवर्षी दर्शन घेतात. भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी चोख व्यवस्था करण्यात आली असून १५० स्वयंसेवक सेवा देण्यासाठी राहणार आहेत.
रांगेत ताटकळत बसलेल्या भाविकांना जागेवर पाण्याची सोय या स्वयंसेवकांकडून करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मंदिरातील इतर सेवा करण्यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत.
भक्तांच्या सोयीसाठी व्यंकटेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष जयेंद्र द्यावनपल्ली, रायलिंग रामय्या आडम, राजेशम येमूल, व्यंकटेश चिलका, नरहरी चिप्पा, श्रीनिवास बोद्धूल, लक्ष्मीनारायण कमटम, श्रीनिवास गाली, राजीव जक्कन, गोविंद बुरा हे गेल्या दोन दिवसांपासून परिश्रम घेत आहेत.
का घ्यावे दर्शन...
- वैकुंठ एकादशीला मुक्कोटी एकादशी असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यास मुक्ती मिळते, असे म्हटले जाते, त्यामुळे या दिवशी उपवास केला जातो.
उत्तरद्वार दर्शन
- भगवान विष्णू निद्रेतून जागे झाल्यावर उत्तर द्वारातून येतात. त्यामुळे या दिवशी उत्तर द्वारामधून येऊन दर्शन घेतले जाते.
रक्तदान शिबीर
- गेल्या पाच वर्षांपासून वैकुंठ एकादशीच्या दिवशी मंदिराच्या समोर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असते. यावर्षीही शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दर्शनासाठी येणारे भाविक-भक्त रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपतात.
दीड लाखांची फुले...
- भगवंतांच्या सजावटीसाठी दीड लाखांची रंगीबेरंगी फुले बेंगलोर, पुणे आणि चेन्नई या ठिकाणाहून मागविण्यात आली आहेत. प्रवेशद्वार, गाभारा आणि मंदिराचा परिसर फुलांनी सजविण्यात आला आहे. भाविकांना प्रसाद म्हणून दहीभात, पुलहोरा, पोंगाली हे भाताचे प्रकार देण्यात येणार आहेत. यासाठी खास तिरुपतीहून आचारी आणण्यात आले आहेत. हे आचारी ३०० किलोंचा पुलहोरा प्रसादासाठी शिजवत आहेत.