आषाढी एकादशीपूर्वी होणार विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर वज्रलेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:59 PM2020-06-05T12:59:01+5:302020-06-05T13:01:18+5:30
पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांची वेळ घेणार; मूर्ती संवर्धनाबाबत विधी व न्याय विभागाची संमती
पंढरपूर : श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या मूर्ती संवर्धनाबाबत विधी व न्याय विभागाने प्रस्ताव मंजूर करून परवानगी दिलेली आहे. यामुळे पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांची वेळ घेऊन आषाढी एकादशीपूर्वी वज्रलेपाचे काम पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न राहील, असे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे थेट पददर्शन भाविकांना मिळते. यामुळे भाविकांचे हात लागून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्तीची झीज होते. यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने या मूर्तीचे संवर्धन (वज्रलेपन) करण्याबाबत मंदिर समितीने पुरातत्त्व विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार पुरातत्त्व विभागाने १६ मार्च २०२० या अन्वये श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या संवर्धनासाठी वज्रलेप करण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले आहे. यानुसार मूर्ती संवर्धन करण्यास शासन मान्यता देते, असे पत्र विधी व न्याय विभागाचे कार्यासन अधिकारी सुनीता साळुंके यांनी दिल्याची माहिती विठ्ठल जोशी यांनी दिली़