दक्षिण तालुक्यातील वडापूर बॅरेजेसला जलसंपदा खात्याची तत्त्वत: मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:04 PM2019-01-04T12:04:51+5:302019-01-04T12:07:28+5:30
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा नदीवर वडापूर बॅरेजेससाठी जलसंपदा मंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, यासाठी तातडीने प्रस्ताव सादर ...
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यात भीमा नदीवर वडापूर बॅरेजेससाठी जलसंपदा मंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, यासाठी तातडीने प्रस्ताव सादर केल्यास प्रशासकीय मंजुरी देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. या बॅरेजेससाठी २२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
सन २००३ पासून वडापूर धरणाच्या मुद्यावर राजकारण सुरू होते. वडापूर गावचे विस्थापन, धरणाचा खर्च अशा अनेक समस्या समोर असताना मागील २० वर्षांपासून धरण केवळ चर्चेचा विषय ठरले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी धरण बांधण्याऐवजी या ठिकाणी बॅरेजेसचा प्रस्ताव मांडला. धरणाऐवजी बॅरेजेस बांधल्यास गावच्या जमिनी शाबूत राहतील आणि गावच्या विस्थापनाचा प्रश्न उद्भवणार नाही, हा मुद्दा प्रभावीपणे मांडला. त्यामुळे पाणी तंटा लवादाचे उल्लंघन देखील होणार नाही असा निर्णय झाला. जलसंपदा विभागाकडे वारंवार झालेल्या बैठका व पाठपुराव्यातून आज ४.६७२ द. ल. घ. मी.च्या पाणी साठवण क्षमतेच्या वडापूर बॅरेजेसला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती सहकारमंत्री देशमुख यांनी दिली .
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे होणाºया बॅरेजेसमुळे १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, आजूबाजूच्या गावांनाही याचा लाभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या खालील बाजूस कर्नाटक राज्यातील सीमेपर्यंत भीमा नदीची लांबी २६० कि.मी. आहे. तसेच सीना नदीची भीमा-सीना जोड कालव्यापासून खालील भागात भीमा नदीच्या संगमापर्यंतची लांबी १३५ कि.मी. आहे. व नीरा नदी ते भीमा नदी संगमापर्यंतची नीरा नदीची लांबी २५ कि.मी. आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर २४, सीनावर २२ व नीरा नदीवर ५ को.प.बंधारे आहेत.
या ठिकाणी बॅरेजेस बांधण्याबाबतची मागणी केली आहे. या नद्यांवर अस्तित्वातील एकूण ५१ बंधारे आहेत. तेथे बॅरेजेस व्हावे अशी मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली असून, प्रायोगिक तत्त्वावर वडापूर बॅरेजेसला मंजुरी देऊन सदरील ठिकाणी पहिले बॅरेजेस बांधण्यात येणार आहे व हीच संकल्पना जिल्ह्याला लागू होणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.