मुंबईहून सोलापूरला येणारी वंदे भारत कलबुर्गीपर्यंत धावणार; रेल्वे मंत्र्यांकडून तत्वत: मान्यता
By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 10, 2023 10:57 AM2023-03-10T10:57:19+5:302023-03-10T10:57:47+5:30
कलबुर्गी ते बिदर दरम्यान डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनीट्स ट्रेनचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्याहस्ते कलबुर्गी रेल्वे स्थानकावर झाले.
सोलापूर : मुंबईहून सोलापूरला येणारी वंदे भारत एक्सप्रेस सोलापूरहून कलबुर्गी रेल्वे स्टेशन पर्यंत नेण्याचा प्राथमिक निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतल्याची माहिती कलबुर्गीचे खासदार डॉ. उमेश जाधव यांनी दिली आहे. यासाठी त्यांचा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
कलबुर्गी ते बिदर दरम्यान डिझेल इलेक्ट्रिक मल्टीपल युनीट्स ट्रेनचे उद्घाटन डॉ. जाधव यांच्याहस्ते कलबुर्गी रेल्वे स्थानकावर झाले. यावेळी त्यांनी वंदे भारत कलबुर्गी पर्यंत येणार असल्याची माहिती दिली. अधिक माहिती देताना डॉ. जाधव यांनी या वेळी सांगितले, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन वंदे भारत कलबुर्गी पर्यंत आणण्याची विनंती केली. विनंती नंतर त्यांनी यास तत्वत: मान्यता मिळाली आहे.
सध्या वंदे भारत एकशे दहा किमीने धावत आहे. लवकरच वंदे भारतची गती एकशे तीस किमी होणार आहे. त्याकरीता रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रूळांची क्षमता वाढविण्याचे काम सुरू आहे. जवळपास सहा महिन्यांच्या आत वंदे भारतची गती वाढणार असून त्यानंतर वंदे भारत सोलापूरहून कलबुर्गी पर्यंत धावू शकते. मुंबईहून दुपारी सव्वा चार वाजता वंदे भारत सोलापूरकडे रवाना होते. सोलापूर रेल्वे स्थानकावर ही गाडी रात्री दहा वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचते. त्यानंतर ही गाडी रात्री सोलापुरात मुक्कामाला थांबते. पुन्हा सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी मुंबईकडे रवाना होते. दुपारी साडे बारा दरम्यान मुंबईत ही गाडी पोहोचत. रात्री सोलापुरात मुक्काम करण्यापेक्षा ही गाडी कलबुर्गी पर्यंत नेण्याचे प्रयत्न रेल्वेकडून सुरू असल्याची माहिती आहे.