दररोज १०.४० वाजता येणारी 'वंदे भारत' मध्यरात्री १ वाजता सोलापुरात पोहोचली
By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 6, 2023 02:53 PM2023-03-06T14:53:05+5:302023-03-06T15:08:50+5:30
कोणतीच जीवितहानी किंवा गाडीचेही काही नुकसान झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : पुण्याहून सोलापूरकडे येणारी ४० डब्यांची मालवाहतूक गाडी दौंड जवळ रुळावरून खाली घसरली. या गाडीचा मधला डबा रुळावरून घसरल्यामुळे ट्रेन चालकाने गाडी लगेच थांबवली. गाडीचा वेग कमी होता. त्यामुळे ही गाडी जमिनीवर पलटी झाली नाही. रात्री साडेनऊनंतर गाडी रुळावर आली. विशेष म्हणजे ही मालवाहतूक गाडी रिकामी होती. घसरलेली मालवाहतूक गाडी दौंड जवळ अडीच ते तीन तास थांबून राहिली. त्यामुळे पुणे-सोलापूर मार्गावरील सर्व गाड्या ब्लॉक झाल्या. सर्वच गाड्यांचे नियोजित वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवासी वैतागले. अधिकाऱ्यांना फोन करून तक्रारी केल्या. पुण्याहून सोलापूरकडे येणारी वंदे भारत, हुतात्मा एक्सप्रेससह इतर गाड्या तीन ते चार तास उशिरा सोलापूर स्थानकावर पोहोचणार असल्याची माहिती रेल्वेचे अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री लोकमतला दिली.
कोणतीच जीवितहानी किंवा गाडीचेही काही नुकसान झाले नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही घटना सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी दौंड येथील ए केबल लाईनवर घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीआरएम नीरजकुमार दोहरे यांच्यासह इतर अधिकारी दौंडकडे रवाना झाले. वंदे भारत मधील प्रवासी हैराण संध्याकाळी सात वाजता पुणे रेल्वे स्थानकावर येणारी वंदे भारत साडेनऊ दरम्यान खडकी जवळच उभी होती. त्यामुळे या गाडीला सोलापूर स्थानकावर पोहोचायला रात्रीचे १ वाजले, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.